मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्ण काळ गाजवलेला अभिनेता म्हणजे 'अजिंक्य देव' (Ajinkya Deo). अजिंक्य देवने फक्त मराठी सिनेइंडस्ट्रीतच नाही तर बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये काम केले आहे. अभिनेत्याने आजवरच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. नुकतेच अजिंक्य देवने लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याच्या करिअरसोबत खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. या मुलाखतीत बोलताना त्याने शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि आता महाराष्ट्राला खरी त्यांची गरज असल्याचेही खंत व्यक्त केली.
अजिंक्य देव याने नो फिल्टर कार्यक्रमात बाळासाहेबांसोबतच्या आठवणींबद्दल सांगितले. तो म्हणाला की, बाळासाहेब यांच्यासोबतचे अनेक क्षण आहेत. मोठे झाल्यानंतरही त्यांना मी खूप भेटायचो. एकदा मी मातोश्रीवर गेलो होतो. त्यावेळी ते खाली गप्पा मारत होते. त्यांचं बोलणं स्फुर्तीदायक होतं. ते मनापासून बोलायचे. त्याच्यामध्ये कुठेच प्लान, डिझाईन नसायचे. आज त्यांची महाराष्ट्राला खरी गरज होती. पण देवाची मर्जी वेगळी होती.
देव कुटुंबाला ठाकरे कुटुंबाने नेहमीच मदत केली
तो पुढे म्हणाला की, मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की सर्व दिग्गज लोकांचा कुठेना कुठे तरी आशीर्वाद लाभला. माझे पहिले दोन चित्रपट भालजी पेंढारकरांसोबतचे होते, अनंत मानेंकडे काम केले. बाळासाहेबांचे आशीर्वाद पाठीशी होतेच. त्या कुटुंबाचे आमच्यावर खूप उपकार आहेत. देव कुटुंबाला ठाकरे कुटुंबाने नेहमीच मदत केली आहे. ते सतत आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
वर्कफ्रंट...अजिंक्य देवने १९८५ साली अर्धांगिनी चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. दोन वर्षानंतर १९८७ साली त्याने सर्जा या चित्रपटात काम केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर त्याचे फॅन फॉलोव्हिंग खूप वाढले. मराठी सिनेइंडस्ट्रीनंतर त्याने बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला. २००४ साली आन मेन अॅट वर्क चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने आणखी काही चित्रपटात काम केले. शेवटचा तो जय भवानी जय शिवाजी मालिकेत पाहायला मिळाला. लवकरच एका मराठी चित्रपटात तो काम करताना दिसणार आहे.