Rohit Mane: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने अनेक नवोदित कलाकारांना ओळख मिळवून दिली आहे. त्यातील एक नाव म्हणजे रोहित माने (Rohit Mane). साताऱ्याचा विनोदी तारा म्हणून ओळखला जाणारा हा अभिनेता आता घराघरात पोहोचला आहे. रोहितने आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये 'सावत्या' या नावाने तो सर्वत्र प्रसिद्ध झाला. रोहित मानेचा सोशल मीडियावर भलामोठा चाहतावर्ग आहे. त्यामाध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. आज नुकतीच सोशल मीडियावर अभिनेत्याच्या पत्नीने त्याच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्याने पत्नी श्रद्धा किरवेने त्याला वाढदिवसाच्या रोमॅन्टिक अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
नुकतीच रोहित मानेच्या पत्नीने आपल्या लाडक्या नवरोबासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये तिने दोघांचे काही सुंदर फोटो सुद्धा शेअर केले आहेत. दरम्यान, ही पोस्ट शेअर करत श्रद्धाने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "हॅप्पी बर्थडे...! माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभी असणारी व्यक्ती..., माझ्या रागामागचं आणि हसण्यामागचं कारण, भयान वादळातली शांतता, माझ्या कमकुवतपणामागची ताकद..., माझ्या यशामागचा आधारस्तंभ आणि मला मिळालेलं जगातील सर्वोत्तम गिफ्ट...!"
पुढे तिने लिहिलंय, "तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा निखळ आनंद देणारा आहे. दिवसेंदिवस माझं तुझ्याबद्दल असलेलं प्रेम वाढत चाललं आहे. या विशेष दिवशी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..., Love You..!" असं कॅप्शन देत रोहितच्या पत्नीने त्याला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय अभिनेत्याने ही पोस्ट सोशल मीडियावर रि-शेअर केल्याची पाहायला मिळते. रोहित मानेच्या पत्नीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवर मराठी कलाकार देखील कमेंटच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहेत. अभिनेत्री नम्रता संभेराव, वनिता खरात या हास्यजत्रेतील कलाकारांनी या पोस्टवर कमेंट करत अभिनेत्याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, रोहित माने आणि श्रद्धा किरवे यांनी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या सुखी संसाराला आता ४ वर्ष पूर्ण झाली आहेत. अलिकडेच रोहितने मुंबईत हक्काचं घर घेऊन तो मुंबईत स्थायिक झाला आहे.