Join us

भरून पावलो,आयुष्य सार्थकी लागलं...!  लतादीदींनी समीर चौघुलेंना पाठवली ‘आयुष्यातील सर्वात मोठी ट्रॉफी’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 12:58 PM

Maharashtrachi Hasya Jatra : लाखमोलाचा क्षण!! साक्षात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कडून कौतुकाची थाप मिळाल्यानंतर कोण भारावणार नाही? समीर चौघुले यांची अवस्थाही वेगळी नाही.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasya Jatra ) या कार्यक्रमात समीर चौघुले (Samir Choughule) आणि विशाखा सुभेदार ( Vishakha Subhedar) यांची जोडी स्टेजवर आली की, बघणारा खळखळून हसतो. बड्या बड्यांची दाद मिळते, ती म्हणूनच. तुम्हाला आठवत असेलच, ‘कौन बनेगा करोडपती 13’च्या सेटवर चक्क अभिनयाचा बादशाह अर्थात अमिताभ बच्चन यांनी समीर यांना आदराने वाकून नमस्कार केला होता. तो क्षण समीर यांच्यासाठीच नाही तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या अख्ख्या टीमसाठी लाखमोलाचा क्षण होता. आता गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar ) यांनीही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमचं भरभरून कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर दीदींनी समीर चौघुले यांना एक सुंदर भेटवस्तू आणि स्व-हस्ताक्षरातील पत्र पाठवून कौतुकाची थाप दिली आहे.

साक्षात गानकोकिळेकडून कौतुकाची थाप मिळाल्यानंतर कोण भारावणार नाही? समीर चौघुले यांची अवस्थाही वेगळी नाही. भरून पावलो... आयुष्य सार्थकी लागलं..., अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लता दीदींकडून मिळालेली भेट आणि त्यांच्या स्व-हस्ताक्षराती पत्राचा फोटो शेअर करत समीर यांनी एक पोस्ट लिहिली आहे.

या पोस्टमध्ये ते लिहितात...,निसर्ग किती ग्रेट आहे न !शब्द संपले की भावनांना वाट मिळावी म्हणून त्याने अश्रूंची निर्मिती केली...आज ते प्रकषार्ने जाणवलं...आज सुरांची आणि स्वरांची सरस्वती आदरणीय लता मंगेशकर दीदींनी अत्यंत प्रेमाने घरी एक भेटवस्तू आणि माज्या आयुष्यातील सर्वात मोठी ट्रॉफी पाठवली. आणि ती ट्रॉफी म्हणजे दिदींच्या हस्ताक्षरातील शुभेच्छा आणि आशीर्वाद....थिजून जाणं म्हणजे काय ते आज मला कळलं..लतादीदी महाराष्ट्राची हास्यजत्रा नेहेमी बघतात आणि खूप हसतात....एन्जॉय करतात ही आम्हा महाराष्ट्राची हास्यजत्रा कुटुंबियांसाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. हा सुवर्ण क्षण आयुष्यात आला तो फक्त आणि फक्त आमच्या हास्यजत्रा कुटुंबामुळे..या पोस्टमध्ये समीर यांनी   या पोस्टमध्ये समीर यांनी सोनी मराठी वाहिनीचे प्रमुख अजय भालवणकर, नॉन फिक्शन प्रमुख अमित फाळके, ईपी गणेश सागडे, सिद्धुगुरू जुवेकर यांच्यासह सचिन गोस्वामी सर आणि सचिन मोटे यांचाही आवर्जून उल्लेख करत त्यांचे आभार मानले आहेत. 

तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे...या पोस्टमध्ये समीर यांनी विशाला सुभेदार हिचेही खास आभार मानले आहेत. खास आभार माझी पार्टनर विशाखा सुभेदार... विशु, तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे, असं त्यांनी लिहिलं आहे.

टॅग्स :समीर चौगुलेलता मंगेशकरमहाराष्ट्राची हास्य जत्रा