सोनी मराठीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सर्वांचे निखळ मनोरंजन करतो आहे. अल्पावधीत या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. आजच्या कठीण परिस्थितीत हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या टेन्शनवरची मात्रा ठरतो आहे. कोविड सेंटरमध्ये बऱ्याचदा चिंतेचं आणि नैराश्याचं वातावरण असतं. रुग्णांना मनोरंजनाचे क्षण मिळावेत आणि त्यांनी दिलखुलास हसावं यासाठी अकोल्यातील मा. मधुकरराव पिचड आरोग्य मंदिर या कोविड सेंटरने आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी एक युक्ती शोधून काढली. या कोविड सेंटरमध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या सोनी मराठी वाहिनीवरील सर्वांच्या लाडक्या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जातंय.
गेली दीड वर्षं करोन काळात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सगळ्यांच्या टेन्शनवरची मात्रा ठरते आहे. क्वारंटाईनच्या काळात हास्यजत्रा पाहून अनेकांना दिलासा मिळाला आणि त्यांचं मानसिक स्वास्थ्य सुधारलं, अशा आशयाचे मेसेज आणि इमेल्स टीमला मिळाले होते. कोविड सेंटरनी रुग्णांसाठी हास्यजत्रेचं प्रक्षेपण करणं, ही कलाकारांना आणि कार्यक्रमाला मिळालेली समाधानाची पोचपावती आहे. प्रेक्षकांना फ्रेश एपिसोड्सची मेजवानी म्हणून कार्यक्रमाचे शूटिंग राज्याबाहेर सुरु आहे, दमणमध्ये सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचे शूटिंग केले जातेय.