'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहिली आहे. कलाकार सध्या व्यक्त होणं का टाळतात? सध्याची सामाजित-राजकीय परिस्थिती त्याला पोषक आहे का? अशा मुद्द्यांवर बोट ठेऊन सचिन गोस्वामी लिहितात की, "कलावंत सामाजिक राजकीय प्रश्नांवर व्यक्त का होत नाही? अमुक अमुक झालं तेंव्हा झोपला होता काय? असा प्रश्न सर्रास नियमित व्यक्त होणाऱ्या आणि अजिबात व्यक्त न होणाऱ्या कलाकाराला नेहमीच विचारला जातो. माझ्याबाबत सांगायचं तर मी वारंवार सभोवताली घडणाऱ्या घटनांवर व्यक्त होत आलोय."
"मणिपूर,निर्भया बलात्कार,खून,बदलापूर बालिकांवरील अत्याचार,खैरलांजी,उत्तरप्रदेशातील मोबलिंचिंग,पालघर साधुंचा निर्घृण खून, साक्षी मलिक,महिला पहिलवान आवहेलना,शेतकरी आंदोलन,मराठा मोर्चा ,त्यांवरील लाठीचार्ज,ईव्हीएम,सामाजिक एकोपा बिघडवण्यासाठी द्वेषयुक्त वातावरण निर्माण केलं जातंय या बाबतची हतबलता,वाढत चाललेली गुन्हेगारी,संविधान जपण्याची काळजी, या आणि अशा अनेक मुद्द्यांवर,घटनांवर मी बोललो,व्यक्त झालो आहे. पण हल्ली एकूणच सामाजिक आणि राजकीय परिस्थती किळसवाणी झालीय .आणि हळूहळू बातम्यांपासून, न्यूजचॅनलपासून अलिप्त झालो. व्यक्त होणं कमी केलं.."
"पूर्वी व्यक्त झालो की माझं मत हे वैयक्तिक मानलं जायचं. पण हास्यजत्रा लोकप्रिय झाल्यानंतर मात्र ते हास्यजत्रेच्या दिग्दर्शकाचं म्हणून प्रसिद्धी माध्यमांच्या वतीते प्रसारित होऊ लागलं. माझ्या टीम मधे वेगवेगळ्या विचारधारेचे लोक आहेत.मी प्रत्येकाच्या विचार,आहार,विहार स्वातंत्र्याचा आदर करतो.त्यामुळे माझ मत ज्यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात घेतलं जाऊ लागलं तेव्हापासून व्यक्त होणं कमी केलं. समाजमाध्यमांवर व्यक्त झालो नाही म्हणजे सध्या घडणाऱ्या घटनांनी व्यथित होत नाही असं नाही."
"'बिड'च्या घटनेने अस्वस्थ झालोच होतो.संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्त्येने अस्वस्थ झालोच होतो.संविधानाच्या अनादराचा निषेध म्हणून शांतपणे आंदोलन करणारा विद्यार्थी न्यायालयीन कोठडीत मृत्यूपावतात हे क्लेषदायकच आहे. त्याचं दुःख होतंच आहे. आज राजकारणात नित्तिमत्ता,सभ्यता ,सुसंस्कृतपणा हरवलाय. दहशत आणि बेछुट ट्रोलिंगने मोकळेपणाने व्यक्त होणं कलावंत टाळू लागले आहेत."
"कलावंत ,जो सॉफ्ट टारगेट आहे तो त्याला वाटतं तसं निर्भीडपणे बोलू शकेल असं पोषक वातावरण खरंच आहे? ट्रोलर्सच्या झुंडीना तोंड देत बसणं प्रत्येकाला शक्य आहे? ज्यांच्या दहशतीने आपल्या गावचं,शहराचं शांत जगणं हिसकावले आहे,ज्यांच्या गुंडगिरीने ,भ्रष्ट्राचाराने,आपण त्रस्त आहोत अश्याच लोकप्रतिनिधीना आपण सातत्याने का निवडून देत आहोत ?हा विचार आपण करतो?
"कलावंतांकडून निर्भयतेची अपेक्षा करताना या गोष्टीही विचारात घेतल्या पाहिजे,. अर्थात तरीही मी बोलतो..शक्य तिथे ,जमल्यास माझ्या कलाकृतीतही ,असो… २०२४ संपतंय त्या निमित्ताने हा आढावा.. २०२५ टोलमुक्त महाराष्ट्र होवो ना होवो,ट्रोलमुक्त तरी व्हावा ही अपेक्षा." अशाप्रकारे सचिन गोस्वामींनी लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे."