Prithvik Pratap: मागील काही दिवसांपासून मराठी मनोरंजनविश्वात 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या सिनेमाबद्दल तुफान चर्चा सुरु आहे. येत्या ३१ जानेवारीला म्हणजे उद्या हा चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं, तर देवाच्या घरी नक्की पोहोचेल असं वाटणाऱ्या एका लहान निरागस मुलीचा देवाच्या घराचा शोध "मुक्काम पोस्ट देवाचं घर" या चित्रपटातून उलगडणार आहे. यानिमित्ताने कलाकारमंडळी पत्राच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. अशातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasya Jatra) फेम पृथ्वीक प्रतापने (Prithvik Pratap) त्याच्या वडिलांसाठी खास पत्र लिहिलं आहे.
सोशल मीडियावरपृथ्वीक प्रतापने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून त्याच्या चाहते देखील भावुक झाल्याचे पाहायला मिळतायत. नेमकं पृथ्वीकने या पत्रात काय लिहिलंय? जाणून घेऊया. दरम्यान, अभिनेत्याने त्याच्या बाबांना लिहिलेल्या या पत्रामध्ये लिहिलंय की, "प्रिय बाबा....! आज खूप हिंमत करुन हे पत्र लिहितो आहे. 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' सिनेमाचा ट्रेलर पाहिला. सिनेमात जिजा तिच्या देवा घरी गेलेल्या बाबाला पत्र लिहिते. त्यावरुन मी सुद्धा प्रेरणा घेतली. बरं पत्रास कारण की, बरंच बोलायचं आहे तुझ्याशी. तू गेलास तेव्हा अगदी सव्वा वर्षांचा होतो, मी धड बोबडे बोलही बोलू शकत नव्हतो आणि तू ते ऐकूही शकला नाहीस; आणि धडपडताना, उभं राहताना मला सांभाळूही शकला नाहीस. पण, आज मी व्यवस्थित अस्खळित बोलू शकतो आणि जगाच्या शर्यतीत धावूही शकतो. आज माझी ओळख पृथ्वीक प्रताप अशी आहे. ही ओळख मिळत असताना ती शरीररुपी सोबत नव्हतास. पण, मनात प्रत्येक क्षणी तू होतास. मला माहिती आहे तू देवाच्या घरी खूप काम करतोस पण आता सुट्टी घेऊन माझी घौडदौड ये की रे बघायला. "
पुढे अभिनेता म्हणतो, "एकदा डोक्यावर हात ठेव आणि म्हण बाळा अभिमान वाटतो मला. बस्सं साऱ्या जन्माचं सार्थक होईल..., माझ्या आणि एक मागणी जिजाच्या पत्राला जसा तिचा बाबा देवाच्या घरुन उत्तर देतो. तसं किमान एक उत्तर तू मला तूझ्या पत्रातून दे आणि ते पत्र मला पाठवं, मी शेवटच्या श्वासापर्यंत त्याची वाट पाहीन, आणि हो आईची काळजी मी शहाण्या मुलासारखा घेतो आहे. पण, प्लीज तू सुद्धा तूझी काळजी घे, आणि हो लवकर परत ये तुझा लाडका पृथ्वीक प्रताप...., 'मुक्काम पोस्ट देवाचं घर'...!"
कधी होतोय रिलीज?
चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन केले आहे. या चित्रपटात मायरा वायकूळ, मंगेश देसाई, कल्याणी मुळे, प्रथमेश परब, रेशम श्रीवर्धन, सविता मालपेकर, उषा नाडकर्णी, माधवी जुवेकर, कमलेश सावंत, स्पृहा परब, रुक्मिणी सुतार यांच्या मध्यवर्ती भूमिका चित्रपटात पहायला मिळणार असून अभिनेत्री पूजा सावंत ही पाहूण्या कलाकारच्या भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहे.