'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. हास्यजत्रेतील कलाकार विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. या शोने अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली. या संधीचं सोनं करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे निमिष कुलकर्णी. अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या निमिषची आता थेट बॉलिवूड सिनेमात वर्णी लागली आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अग्नी' या बॉलिवूड सिनेमात निमिष झळकला आहे. या सिनेमात त्याने अग्निशामक दलातील निपुण धर्माधिकारी ही भूमिका साकारली आहे. 'अग्नी' सिनेमाच्या सुरुवातच निमिषच्या एन्ट्रीने होत आहे. या सिनेमात त्याने सई ताम्हणकरसोबत स्क्रीन शेअर केली आहे. या सिनेमातील निमिषच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक होत आहे. 'अग्नी' सिनेमाबाबत निमिषने पोस्ट शेअर केली आहे. "काल अग्नि पाताल अग्नि रक्षक अग्नि रण अग्नि!! या सुंदर प्रवासाचा भाग बनवल्याबद्दल @rahulpdholakia सरांचे आभार. माझी फेव्हरेट सई ताम्हणकरबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळणं म्हणजे माझं भाग्य...", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
'अग्नी' हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात प्रतिक गांधी, संयमी खेर, सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. ६ डिसेंबरला हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, निमिषने अनेक नाटकांमध्येही काम केलं आहे.