Join us

स्ट्रगल इथले संपत नाही! मराठी सिनेमांना थिएटर्स मिळण्यावरुन प्रसादची पोस्ट, म्हणाला- दरेकरांनी अधिवेशनात विषय मांडला आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 6:32 PM

मराठी सिनेमांना थिएटर्स मिळत नसल्याचा मुद्दा दरेकरांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. हा व्हिडिओ शेअर करत प्रसादने याबाबत एक पोस्ट लिहिली आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रसाद खांडेकर. उत्तम अभिनयाबरोबर प्रसाद लेखक आणि दिग्दर्शकही आहे. त्याने दिग्दर्शित केलेला एकदा येऊन तर बघा हा सिनेमा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. पण, प्रसादच्या या सिनेमाला थिएटर्स मिळत नाही आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधनासभेत भाजपा आमदार प्रविण दरेकर यांनी प्रसाद खांडेकरचा मुद्दा उपस्थित केला. मराठी चित्रपटांच्या होणाऱ्या या गळचेपीबाबत राज्य शासनाने लक्ष घालून सहकार्य करावे अशी मागणीही त्यांनी केली. त्याला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर दिले. संसदेतील हा व्हिडिओ शेअर करत प्रसादने याबाबत एक पोस्ट लिहिली आहे. 

प्रसाद खांडेकरची पोस्ट

स्ट्रगल इथले संपत नाही ...

"एकदा येऊन तर बघा" सिनेमा 8 डिसेंबर पासून सर्वत्र प्रदर्शित होतोय. झालं असं की आत्तापर्यंत बऱ्याचदा अस झालंय की मराठी सिनेमांना थिएटर्स मिळताना खूप मारामार करावी लागते. ज्या सिनेमाच्या पाठीशी मोठे बॅनर आणि मोठे प्रोडक्शन हाऊस असतात त्यांच्या नशिबात आरामात थिएटर्स मिळतात. पण, हा आत्तापर्यंतचा अनुभव फक्त वाचून आणि ऐकून होतो, पहिल्यांदा हा अनुभव आता मला माझ्या पहिल्याच सिनेमाच्या बाबतीतसुद्धा आला.

मुळात सगळेच मराठी सिनेमे थिएटरमध्ये चालावेत म्हणून आधीच इतर दोन मराठी सिनेमांची रिलीज डेट अनाऊन्स झाल्यामुळे मी माझ्या सिनेमाची रिलीज डेट दोनदा पुढे ढकलून दीड महिने आधीच मी २४ नोव्हेंबर ही तारीख अनाऊन्स केली. जेणेकरुन त्यावेळी जर कोणी रिलीज करणार असतील तर मराठी सिनेमांची आपापसात स्पर्धा नको व्हायला. तरीही एका मोठ्या मराठी सिनेमाची त्या दिवशी रिलीज डेट अनाऊन्स झाली. आता ह्या सिनेमातील ही सगळेच मित्र मैत्रिणी असल्या कारणाने आणि पुन्हा एकाच दिवशी रिलीज करून पुन्हा स्पर्धा नको म्हणून डिस्ट्रिब्युटर सोबत चर्चा करून पूर्ण पब्लिसिटी झालेली असताना सुद्धा सिनेमा अजून दोन आठवडे पुढे ढकलला आणि 8 डिसेंबरला रिलीज करण्याचं ठरवलं. 8 डिसेंबरला थिएटर्स आणि स्क्रिन्स नक्की मिळतील असं आश्वासन मिळालं. 

परंतु, आता शुक्रवारी फिल्म रिलीज असताना बुधवार रात्र आली तरी सिनेमाला थिएटर आणि स्क्रिनस मिळत नव्हते. बरं जे मिळाले ते हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आणि छोटे स्क्रिन त्यातही सकाळ आणि दुपारचे शोज मिळत होते. सोशल मीडियावरून प्रेक्षक थेट विचारत होते की सिनेमा आमच्या भागातल्या थिएटर्स ना दिसत नाहीये. मी बोरिवलीमध्ये राहायला ....माझ्या स्वतःच्या घरच्यांना सिनेमा पाहायचा आहे पण जवळच्या थिएटरमध्ये शोच नाही आणि मग हे घडलं. कलाकार असल्यामुळे सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच लोकांसोबत खूप छान संबंध आहेत. आज सकाळी मा.प्रविण भाऊ दरेकर ह्यांच्यासोबत बोलताना मी त्यांना झालेला प्रकार सांगितला आणि त्यांनी तो तात्काळ अधिवेशनात मांडला आणि चक्र फिरली. प्रवीण भाऊ दरेकर ह्यांचे खरंच मनापासून आभार ....मा.मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे , मा उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस , मा. सुधीर मुनगंटीवार साहेब ह्यांचे सुद्धा मनःपूर्वक आभार ...आणि माझा वर्गमित्र सागर बागुल तुला ही थँक्स मित्रा ...हे फक्त माझ्याच सिनेमाच्या बाबतीतील म्हणणं नाहीये तर सगळ्याच मराठी सिनेमांना योग्य न्याय मिळाला पाहिजे.

प्रसाद खांडेकरच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. प्रसाद खांडेकरचा एकदा येऊन तर बघा हा चित्रपट येत्या ८ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात विशाखा सुभेदार, भाऊ कदम, नम्रता संभेराव, तेजस्विनी पंडीत, ओंकार भोजने या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. 

टॅग्स :मराठी अभिनेतामराठी चित्रपटमहाराष्ट्राची हास्य जत्राप्रवीण दरेकर