Join us

'...आणि हार्दिक ने माझ्याकडे बघून वर्ल्ड कप उंचावला', काय आहे प्रसाद खांडेकरची विश्वविजेत्या भारतीय संघाविषयीची पोस्ट?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 9:12 AM

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता प्रसाद खांडेकरने विजयी रॅलीचा अनुभव शेअर केला आहे.

२९ जून हा दिवस भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा व आनंदाचा दिवस होता. या दिवशी अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून टी-२० विश्वचषकावर नाव कोरलं. या विश्वविजेत्या भारतीय संघाचा गुरुवारी मुंबईतील वानखेडे मैदानावर गौरव सोहळा पार पडला आहे. पण त्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचं क्रिकेटप्रेमींनी जोरदार स्वागत केलं. या स्वागतासाठी मरीन ड्राइव्हवर विराट महासागर जमा झाला. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता प्रसाद खांडेकरदेखील आपल्या लाडक्या इंडियन टीमचं कौतुक करण्यासाठी मिरवणुकीत सहभागी झाला. या विजयी रॅलीचा अनुभव त्यानं सोशल मीडियावरील पोस्टमधून शेअर केला आहे.

प्रसादने भारतीय क्रिकेट संघाच्या विजयी रॅलीचा एक व्हिडीओ शेअर केला. प्रसादने कॅप्शनमध्ये  लिहलं, 'आज साऊथ मुंबईला कामानिमित्त जायचंच होत, विचार केला की नरिमन पॉईंटला जाऊन चॅम्पियन्सच्या विजयी मिरवणुकीत पण सहभागी होऊया ... पण न्यूजमधली गर्दीचे फोटो पाहिले आणि जायचा मोह टाळला गप्पपणे बोरिवलीला निघालो'. 

त्याने लिहलं,  'साधारण सांताक्रूझच्या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमत असलेली दिसली आणि पटकन ट्यूब पेटली की अरे आपले चॅम्पियन्स इथूनच जाणार आहेत नंतर थोड्या वेळात आजूबाजूला पाहिलं तर संपूर्ण हायवेवर गाड्या रस्त्यात मध्येच आडव्या टाकून सगळेच टीम इंडियाची वाट बघत होते. क्षणाचाही विलंब न करता गाडीतून उतरलो आणि दुसऱ्या क्षणाला जगजेत्ते गाडीतून समोर आले,अगदी आतून मनातल्या मनात त्यांना एक सॅल्युट ठोकला. कदाचित तो मनातल्या मनात अगदी मनापासून ठोकलेला सॅल्युट टेलिपथीने हार्दिक पांड्यापर्यंत पोहोचला असावा त्यानं सुद्धा पुढील क्षणाला बसमधून माझ्याकडं बघून वर्ल्ड कपचा कप उंचावला'. 

'आयपीएल दरम्यान ज्या मुंबईने हार्दिकला ट्रोल केलं. आज त्याच मुंबईकरांच स्वागत खुल्या दिलाने स्वीकारायला हार्दिक अगदी ड्राइव्हरच्या बाजूला बसलेला. त्याच्या पाठोपाठ अर्ध्या-अर्ध्या सेकंदासाठी दर्शन झालं ते द वॉल राहुल द्रविड. गरजेच्या क्षणी उभा राहणार बुम बुम बुमराह... दुखापतीवर मात करून दमदार पुनरागमन करणारा ऋषभ पंत ....आणि सगळेच.... आमचा बोरिवलीकर रोहित ... विराट सूर्या सगळ्यांनाच सॅल्युट ठोकायचा होता, भेटतील ते ही असे अचानक.गर्दी जमणे आणि जमवणे ह्यातील फरक पाहिला. स्वागतासाठी अशी गर्दी स्वतःहून जमली पाहिजे. टीम इंडिया चॅम्पियन्स तुम्हाला प्रचंड प्रेम आणि अभिमान मित्रांनो भावांनो, या शब्दात त्याने आपला अविस्मरणीय अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला. 

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीभारतमुंबईहार्दिक पांड्याट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024टी-20 क्रिकेट