Join us

मराठी चित्रपटसृष्टीला तुमची गरज! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरचं चाहत्यांना आवाहन, पत्रातून भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:55 IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरनेदेखील या निमित्ताने पत्र लिहिलं आहे. प्रसाद खांडेकरने मराठी प्रेक्षकांना पत्र लिहित त्यांना भावनिक साद घातली आहे. 

'मु.पो.देवाचं घर' या मराठी सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अनेक कलाकार पत्र लिहून त्यांच्या मनातील भावना व्यक्त करत आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरनेदेखील या निमित्ताने पत्र लिहिलं आहे. प्रसाद खांडेकरने मराठी प्रेक्षकांना पत्र लिहित त्यांना भावनिक साद घातली आहे. 

प्रसाद खांडेकरचं मराठी रसिक प्रेक्षकांना पत्र

नमस्कार मी प्रसाद खांडेकर, 

सध्या आमचं बरेच कलाकार मंडळी पत्र लिहित आहेत. म्हणूनच मी देखील विचार केला की मलाही काही व्यक्तींना पत्र लिहायचं आहे आणि आज मी ते लिहितो आहे. 

प्रिय, रसिक मायबाप...तुम्ही आहात म्हणूनच आम्ही आहोत. तुम्हीच डोक्यावर घेता आणि प्रसंगी कानही पकडता. मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीला तुमची गरज आहे. तुम्ही थिएटरमध्ये आलात तर आम्हाला बळ मिळेल. आणि मराठी सिनेसृष्टीचे सोन्याचे दिवस परत येतील. थिएटरमध्ये या वाट बघतोय. तुमचे कृपाभिलाषी सगळे कलाकार...

'मु.पो. देवाचं घर' सिनेमात बालकलाकार मायरा वायकूळ दिसणार आहे. तिच्यासोबत मंगेश देसाई मुख्य भूमिकेत आहेत. याबरोबरच उषा नाडकर्णी, कल्याणी मुळे,प्रथमेश परब, सविता मालपेकर, माधवी जुवेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाच्या टीझर आणि गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. संकेत माने यांचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा येत्या ३१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.  

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारमराठी अभिनेता