'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) मधले सर्व कलाकार आज स्टार झाले आहेत. लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहेत. चाहत्यांनी सर्वांना अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. मात्र या कलाकारांना इथपर्यंत पोहचण्यासाठी मोठा स्ट्रगल करावा लागला हेही तितकंच खरं आहे. हास्यजत्रेतील असाच एक लोकप्रिय कलाकार म्हणजे पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap). पृथ्वीकने आपल्या जबरदस्त विनोदाच्या टायमिंगने सर्वांचे मन जिंकले.
काही दिवसांपूर्वी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची संपूर्ण टीम अमेरिकेला गेली होती. पृथ्वीकही त्यांच्यासोबत गेला होता. त्यावेळी अमेरिकेत फिरताना पृथ्वीने आईच्या साडीपासून बनलेला खास कुर्ता परिधान केला होता. यावर त्याने एक रिलदेखील शेअर केली होती. जी चर्चेत आली होती. आता पृथ्वीने अमेरिकेच्या दौऱ्यातील आठवणींना उजाळा देत एक पोस्ट शेअर केली आहे.
पृथ्वीकची पोस्ट, '' Brooklyn Bridge, आईच्या साडीपासून तयार केलेला कुर्ता आणि माझी स्माईल… या गोष्टींवर लक्ष देण्याव्यतिरिक्त माझी चप्पल आणि बाजूची फॅारेनर यावर लक्ष देणारे… मला जरा नंतर वेगळं भेटा.'' त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही भन्नाट कमेंट केल्या आहेत.. एका यूजरने लिहिले, ''भाई... मी तर आधी तुलाच पाहिलं नंन्तर ती फॉरेनर..... आणि नंन्तर तुझा caption वाचून मग तुजी चप्पल पहिली.'' दुसऱ्याने लिहिले, ''आमचं लक्ष वेधून घेतले ते ब्रिजने..'' अशा अनेक कमेंट्स पृथ्वीच्या पोस्टवर आल्या आहेत.
दरम्यान पृथ्वीकने आंतरमहाविद्यालयीन एकांकिकापासून अभिनयाला सुरुवात केली. काही काळ त्यानं नोकरीही केली. परंतु त्यात तो रमला नाही. त्यानंतर ‘जागो मोहन प्यारे’ या मालिकेतील ‘राहुल’ या विनोदी व्यक्तिरेखेमुळे पृथ्वीक महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचला.