‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम अभिनेत्री, कॉमेडियन वनिता खरात (vanita kharat) हिने अलिकडेच लग्नगाठ बांधली. वनिताने तिचा प्रियकर सुमित लोंढेसोबत लग्न केलं असून तिची सातत्याने चर्चा होत आहे. यामध्येच वनिताने लग्नानंतर पहिला गुढीपाडवा साजरा केला असून या नवीन वर्षाच्या सुरुवातीला तिने नवीन संकल्प केला आहे.
अलिकडेच वनिताने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या नवीन वर्षाच्या संकल्पाविषयी भाष्य केलं आहे. त्यानुसार, तिला वर्षभरात भरपूर झाडं लावायची आहेत. तसंच ती नाटकातही काम करणार आहे. इतकंच नाही तर तिचा नवा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
“ येणाऱ्या या वर्षात मला खूप कामं करायची आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, मला खूप झाडं लावायची आहेत. सोबतच नवीन वर्षात माझा नवा चित्रपट देखील येत आहे. त्याची माहिती मी लवकरच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देईन. तसंच एक नवीन नाटक सुद्धा मला प्लॅन करायचा विचार आहे,” असं वनिता म्हणाली.
दरम्यान, वनिता मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने मराठीसह काही बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलं आहे. वनिता लवकरच दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या पहिल्या मराठी चित्रपटात स्कूल, कॉलेज आणि लाईफमध्ये झळकणार आहे. तसाच तिचा ‘सरला एक कोटी’ हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.