महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ( Maharashtrachi Hasya Jatra ) या कॉमेडी शोमधून घराघरात पोहोचलेला धुरंधर विनोदवीर म्हणजे ओंकार भोजने (Onkar Bhojane). ‘फू बाई फू’ (Fu Bai Fu) या कार्यक्रमामधूनही त्याने प्रेक्षकांना पोट धरु हसायला भाग पाडलं. ‘कोकणचा कोहिनूर’ ओंकारच्या कॉमेडीवर चाहते फिदा आहेत. वेगवेगळ्या स्किटमधील त्याचा बोलण्यातला साधेभोळेपणा, बोबडेपणा सगळ्यांनाच भावतो. सध्या याच ओंकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ओंकार कविता सादर करताना दिसतोय.
अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांना देखील या व्हिडीओची भुरळ पडली आहे. त्यांनी ओंकारचा हा व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाला शेअर करत त्याचं मनापासून कौतुक केलं आहे. “तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची…कमाल गायलंस मित्रा, ओंकार भोजने !” असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
एका कार्यक्रमादरम्यान ओंकारने या कवितेचं सादरीकरण केलं. त्याची ही कविता नेटकऱ्यांनाही भलतीच पसंतीस पडत आहे. ओंकार काय कविता आहे भावा, तू मन जिंकलंस, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. ओंकार खरंच एकच नंबर, अशा अनेक कमेंट हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी केल्या आहेत. जितका उत्कृष्ट अभिनेता तितकाच उत्तम गायक...तरुण पिढी साठी आदर्श दुसऱ्यांन लिहिलयं, अप्रतिम ओंकार दादा..लय मोठा फॅन आहे भाऊ तुझा.
ओंकार हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आला. त्याने त्याच्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. कॉमेडी किंग म्हणून तो ओळखला जातो. पण ‘फू बाई फू’ कार्यक्रमाची ऑफर आल्यानंतर त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला रामराम ठोकला. नुकताच तो सरला एक कोटी या चित्रपटात झळकला.