मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) गेल्या महिनाभरापासून चर्चेत आहे. आधी करुणा शर्मा यांनी एका प्रकरणात प्राजक्ताचं नाव घेतलं. तर दोन दिवसांपूर्वी बीडचे भाजपा आमदार सुरेश धस यांनी परळी इव्हेंट पॅटर्न म्हणत प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांची नावं घेतली. यानंतर मात्र प्राजक्ताने मौन सोडलं आणि काल पत्रकार परिषद घेत राजकारण्यांना सुनावलं. आता प्राजक्ताच्या समर्थनार्थ 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे लेखक सचिन गोस्वामी (Sachin Goswami) यांनी पोस्ट केली आहे.
प्राजक्ताने काल पत्रकार परिषदेत सर्व कलाकारांच्या विशेषत: महिला कलाकारांची बाजूही मांडली. राजकारण्यांनी त्यांच्या गोष्टीत कलाकारांना मध्ये आणू नये असं ती म्हणाली. तसंच तिच्यावर लागलेले आरोप धादांत खोटे आहेत हेही तिने स्पष्ट केलं. हास्यजत्रेचे लेखक सचिन गोस्वानी यांनी फेसबुकवर पोस्ट करत लिहिले, "ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो तो समाज सभ्य समजला जातो.कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज सुसंस्कृत समाज असतो. प्राजक्ता माळी बाबत जे घडतंय ते निषेधार्ह आहे..क्लेषदायक आहे.. आपण निकोप सुदृढ समाजाचा आग्रह धरू या."
सचिन गोस्वामींची ही पोस्ट शेअर करत पृथ्वीक प्रतापनेही तिला पाठिंबा दिला आहे. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे वातावरण चिघळत आहे. यामध्ये मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यावर आरोप होत आहेत. धनंजय मुंडेंविरोधात असंतोष पसरला आहे. त्यातच करुणा शर्मा आणि आता सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव धनंजय मुंडेंशी जोडलं. प्राजक्ता बीडला एका इव्हेंटसाठी उपस्थित होती तेव्हा तिचा धनंजय मुंडेंसोबत फोटो होता. पण याचा सरपंच हत्या प्रकरणाशी संबंध नसताना तिचं नाव उगाचच गोवण्यात आलं आहे. यावरुन प्राजक्ताने काल पत्रकार परिषद घेत राजकारण्यांना हे शोभत नाही असं सांगितलं. तसंच तिने रितसर महिला आयोगात तक्रारही दाखल केली आहे.