बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट (Alia Bhatt) हिनं 2012 मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. 2012 ते 2021 या वर्षांत आलिया बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री बनली आहे. कुठल्याही बापाला याचा अभिमान वाटणारच. आलियाचे पापा व दिग्दर्शक महेश भट हेही याला अपवाद नाही. आपल्या कर्तृत्ववान लेकीबद्दल बोलताना त्यांची छाती अभिमानानं फुलून येते.ऐल या मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत महेश भट (Mahesh Bhatt) आलियाबद्दल भरभरून बोलले. तिचं मनापासून कौतुक केलं.
‘आलिया तिच्या आईबाबासारखी नाहीच मुळीच. तिच्यात एक आग आहे. मी एक दिग्दर्शक होतो पण मी इंडस्ट्रीपासून बरंच अंतर राखून काम केलं. आमचं घर फिल्मी पार्टीचा अड्डा कधीच नव्हता. मी माझ्या पोटापाण्यासाठी चित्रपट बनवले. कदाचित आलियाच्या डोक्यातही हाच विचार असतो. ती अतिशय निष्ठेने काम करते. जग तुम्हाला जज करणार. एक कलाकार बनण्यासाठी तुमच्यात आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. चित्रपट बनवणा-यांबद्दल माझ्या मनात अपार आदर आहे. जे कधी अनेक अडचणींवर मात करत आपल्या मार्गावर चालत राहतात. कमी वयात यशाच्या शिखरावर पोहोचलेल्यांबद्दलही मी हेच म्हणेल. काही वर्षांपूर्वी आलिया एक छोटी मुलगी होती. 500 रूपयांसाठी ती माझ्या पायाला क्रिम लावून द्यायची आणि आज 2 वर्षांत तिने इतका पैसा कमावलांय की, मी तो 50 वर्षांतही कमावू शकलो नाही.’
‘स्टुडंट ऑफ द इअर’मधून डेब्यू केल्यानंतर आलियाच्या करिअरची गाडी सूसाट सुटली. हायवे, 2 स्टेट्स, हम्टी शर्मा की दुल्हनिया, उडता पंजाब, डिअर जिंदगी, राजी, गली बॉय, कलंक, सडक 2 असे वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे आणि तितक्याच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका तिने साकारल्या. 2019 मध्ये आलिया दीपिका पादुकोण व प्रियंका चोप्रा यासारख्या बड्या अभिनेत्रींना मागे सोडत फोर्ब्सच्या टॉप 100 सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्रींच्या यादीत विराजमान झाली. लवकरच आलिया संजय लीला भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय एसएस राजमौलींच्या ‘आरआरआर’, ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’, ‘जी ले जरा’ या सिनेमातही ती झळकणार आहे. रणबीर कपूरसोबतचा ‘ब्रह्मास्त्र’ हा तिचा सिनेमाही येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.