Join us

महेश मांजरेकरांनी केलं 'घरत गणपती' सिनेमाचं कौतुक, म्हणाले- "आमच्याकडेही गणपती येतात तेव्हा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 11:53 AM

'घरत गणपती' सिनेमा पाहिल्यानंतर महेश मांजरेकर भारावून गेले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत या सिनेमाचं कौतुक केलं आहे.

'घरत गणपती' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातून कोकणातील गणेशोत्सव आणि परंपरा या अत्यंत जवळच्या विषयाला हात घालण्यात आला आहे. गणेशोत्सवातील कोकणातील मज्जा मस्ती आणि परंपरा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. कोकणातील गणेशोत्सवाची झलक आणि त्याचं महत्त्व सांगणारा या आगळ्या वेगळ्या सिनेमाची चाहते वाट पाहत होते. नुकतंच या सिनेमाचा प्रिमियर सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर यांनीदेखील 'घरत गणपती' सिनेमा पहिला. 

हा सिनेमा पाहिल्यानंतर महेश मांजरेकर भारावून गेले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत या सिनेमाचं कौतुक केलं आहे. ते म्हणतात, "काल मी घरत गणपती हा खूप सुंदर सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहून मला जुने दिवस आठवले. आमच्याकडेदेखील १० दिवस गणपती येतो. त्यानिमित्ताने सगळे एकत्र येतात. घर म्हटलं की भांडं वाजतचं...ते हेवेदावे सगळं नीट करायचं हे एक निमित्त असतं. खूप छान सिनेमा केला आहे. दिग्दर्शकाचा पहिलाच सिनेमा आहे. पण, त्याने खूप चांगल्या पद्धतीने आणि समजूतदारपणे दिग्दर्शित केलंय. सगळ्याच कलाकारांनी चांगली कामं केलीत. टेक्निकल टीम अप्रतिम...लोकेशन्स सुंदर आहेत...". 

'घरत गणपती' सिनेमाचं कौतुक करत हा सिनेमा थिएटरमध्ये संपूर्ण कुटुंबासह पाहण्याचं आवाहनही मांजरेकरांनी प्रेक्षकांना केलं आहे. दरम्यान, 'घरत गणपती'  सिनेमा येत्या २६ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, शुभांगी गोखले, संजय मोने, शुभांगी लाटकर, परी तेलंग, समीर खांडेकर या कलाकरांच्या मुख्य भूमिका आहेत. अभिनेत्री निकिता दत्ता या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन नवज्योत बंदिवाडेकर यांनी केलं आहे. 

टॅग्स :भुषण प्रधानसिनेमामहेश मांजरेकर