Join us

कॅन्सरमुक्त झाल्यानंतरही महेश मांजरेकरांना आहे एका गोष्टीचं दु:ख, वाचा काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 11:24 AM

Mahesh Manjrekar : शेवटपर्यंत का लपवलं आजारपण? त्याचाही केला खुलासा

काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांना कॅन्सर असल्याची बातमी आली आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. तोपर्यंत मांजरेकरांना उपचार सुरू झाले होते आणि  कॅन्सरला हरवून त्यांनी लढाई जिंकली होती. आताश: कॅन्सरला मात देऊन मांजरेकर शूटींगवर परतले आहेत. पण एका गोष्टीचं दु:ख आहेच.अलीकडे ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मांजरेकरांनी हे दु:ख बोलून दाखवलं. दीड वर्षांपूर्वी कॅन्सरचा उपचार सुरू झाला असता तर माझं ब्लॅडर वाचलं असतं, असं ते म्हणाले.

काही महिन्यांआधी ‘अंतिम- द फाइनल ट्रूथ’  (Antim: The Final Truth)  या सिनेमाचं शूटींग सुरू असताना त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यांनी याबद्दल सविस्तर सांगितलं. ते म्हणाले, ‘माझंब्लॅडर ओव्हरअ‍ॅक्टिव्ह पद्धतीनं काम करत होतं आणि मी दीड वर्षांपासून यावर उपचार घेत होतो. एकदिवस अंतिमचे शूटींग सुरू असताना अचानक मला ब्लीडिंग सुरू झालं. मी लगेच डॉक्टरांकडे गेलो आणि कॅन्सरचं निदान  (Mahesh Manjrekar cancer) झालं. कॅन्सरमुळेच माझं ब्लॅडर ओव्हरअ‍ॅक्टिव्ह झालं होतं. म्हणजेच  दीड वर्षांपासून मला कॅन्सर होता. दीड वर्षाआधीच मी यावर उपचार सुरू केले असते तर कदाचित मी माझं ब्लॅडर वाचवू शकलो असतो.’

पुढे ते म्हणाले, अंतिमचे शूटींग सुरू असताना तीन महिन्यांपर्यंत किमोथेरपी चालली. किमो घेत घेत मी शूटींग केलं. सलमानने मला विदेशात जाऊन उपचार करण्याचा सल्ला दिला होता. पण मी देशातील डॉक्टरांवर विश्वास दाखवला आणि इथेच उपचार सुरू केलेत. किमोचा मला फार असा त्रास झाला नाही. सर्जरीनंतर पूर्णपणे बरं व्हायला मात्र 3 महिने लागलेत.  मला कॅन्सर झाल्याचं कुणाला कळता कामा नये, असं मी सर्वांना बजावलं होतं. कारण अनेकांना कॅन्सर होतो. त्यात फारकाही मोठी गोष्ट नव्हती. माझ्या कॅन्सरबद्दल कळल्यावर मी सहानुभूतीसाठी सांगतोय, असं लोकांना वाटता कामा नये, असा विचार मी तेव्हा केला होता. कॅन्सर असल्याचे समजल्यावर मला मोठा धक्का वगैरे बसला नाही. मी ही गोष्ट सहजपणे स्वीकारली. अनेक लोकांना कॅन्सर होतो. परंतु त्या व्यक्ती या आजाराविरोधात धीराने लढतात आणि त्यातून वाचतात हे मला माहिती होते. त्यामुळे हे सत्य स्वीकारणे मला फार कठीण गेले नाही. माझी संपूर्ण टीम काळजी घेत होती आणि मदत करत होती. त्यामुळे मला काहीही समस्या आली नाही. मी अतिशय नॉर्मल होतो.

टॅग्स :महेश मांजरेकर