सध्या महेश मांजरेकर यांच्या आगामी 'जुनं फर्निचर' सिनेमाची खूप उत्सुकता आहे. या सिनेमात महेश मांजरेकर प्रमुख भूमिका साकारत असून त्यांनीच सिनेमाच्या लेखन - दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. 'जुनं फर्निचर' सिनेमाची गोष्ट कशी सुचली याविषयी महेश मांजरेकर यांनी लोकमत फिल्मीसोबत गप्पा मारताना महत्वाचा खुलासा केलाय. काय म्हणाले महेश मांजरेकर वाचा पुढे.
महेश मांजरेकर म्हणाले, "१० - ११ वर्ष झाली असतील ही गोष्ट मला सुचली. आणि माझी एक सवय आहे की, गोष्ट सुचल्यावर माझ्या डोक्यात सिनेमाची पटकथा लिहायला लागतो. माझ्या डोक्यात अख्खा सिनेमा पिकल्याशिवाय मी लिहायला बसत नाही. माझी आई गेली. वडील आधीच गेलेले. आई - वडील गेल्यावर आपल्याला त्यांचं महत्त्व जास्त कळतं. आपण त्यांचं असणं हे खूप गृहीत धरलेलं असतं. आई - वडील गेल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी आठवतात. आपलं काय चुकलंय याची जाणीव होते. आपण किती वेळ घालवला आई वडिलांसोबत? असं सगळं सुरू होतं. आणि हळूहळू लक्षात यायला लागतं की, झाल्यात आपल्याकडून चुका."
महेश मांजरेकर पुढे म्हणतात, "मला हा सिनेमा करताना आई वडिलांचा छळ करणारा, त्यांची प्रॉपर्टी विकणारा मुलगा नको होता. कारण तो खूपच मेलोड्रामा होतो. आणि असं करणारी मुलं फार कमी असतात. जास्तीत जास्त लोकं म्हणतात आम्ही आई वडिलांशी छान आहोत. पण आपण खरंच छान आहोत का? आपण गृहीत धरलेलं असतं की आई वडील आहेत तर त्यांना कळेल. मी चार दिवस फोन नाही केला, तर त्यांना समजेल की मला वेळ नाही. त्यामुळे हा सिनेमा करताना मला वाईट मुलाची किंवा वाईट सुनेची गोष्ट करायचीच नव्हती. ज्यांना वाटतं की, आई वडिलांची आम्ही काळजी घेतो त्यांची गोष्ट दाखवायची होती. की तुम्ही खरंच काळजी घेता का? कारण तो मुलगा मी होतो. त्यामुळे सिनेमा करताना जे घडलंय तेच मी लिहिलंय. त्यामुळे लोकांना सुद्धा सिनेमाचा ट्रेलर जवळचा वाटतोय. त्यामुळे माझ्या आयुष्यात घडलेल्या गोष्टीचं मी सिनेमात मांडल्या. मला रडत राहणारा म्हातारा करायचा नव्हता. तो थोडा आडमुठा आहे. आणि हेच प्रेक्षकांना खरं आणि जवळचं वाटतंय."