बऱ्याचदा कलाकारांच्या अफेयर्स आणि ब्रेकअप्सच्या चर्चा ऐकायला मिळत असतात. मराठी चित्रपटसृष्टीत बरेच असे कलाकार आहेत ज्यांना पहिल्या प्रेमात अपयश आले आणि मग ते दुसऱ्यांदा प्रेमात पडले. त्यातील काहींनी तर लग्नगाठदेखील बांधली. यात महेश मांजरेकरपासून शशांक केतकर, सिद्धार्थ चांदेकर अशा कलाकारांचा समावेश आहे.
अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी दीपा मेहता कॉश्च्युम डिझाइनर होती. लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघे विभक्त झाले. नंतर महेश मांजरेकर यांनी अभिनेत्री मेधा यांच्यासोबत विवाह केला. महेश मांजरेकर यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत तर मेधा यांनासुद्धा पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत.
अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने २०१४ साली वरुण वैटिकरशी लग्न केले होते. मात्र लग्नाच्या दोन वर्षांनंतर हे दोघे वेगळे झाले. आता अभिज्ञाच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम आले आणि तिने मेहुल पैसोबत लग्नगाठ बांधली आहे.
हिंदी टीव्ही अभिनेता संजीव सेठशी रेशम टिपणीसने १९९३ साली लग्नगाठ बांधली आणि २०१४ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. सध्या रेशम संदेश किर्तीकर या तिच्या मित्राला डेट करत असल्याचे बोलले जाते. हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे म्हटले जाते.
'बिग बॉस मराठी' फेम मेघा धाडे लग्नापूर्वी गरोदर होती. आदित्य पावस्करशी लग्न करण्यापूर्वी मेघाने सिंगल मदर म्हणून जबाबदारी पार पाडली. आदित्यला त्याच्या पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आहे.
'होणार सून मी या घरची' या मालिकेच्या सेटवर तेजश्री प्रधान व शशांक केतकर एकमेकांच्या प्रेमात पडले. २०१४ साली दोघांनी लग्न केले मात्र लग्नाच्या वर्षभरातच त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. नंतर शशांकने प्रियांका ढवळेशी विवाह केला.
बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने काही वर्षांपूर्वी अमेय निपाणकरशी लग्न केले होते. मात्र दोघांचा संसार फार काळ टिकू शकला नाही. घटस्फोटानंतर शर्मिष्ठाने तेजस देसाईशी विवाह केला.
'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेमुळे चर्चेत असलेले अभिनेते गिरीश ओक यांनी पद्मश्री पाठक यांच्याशी लग्न केले होते. या दोघांना गिरीजा ओक ही मुलगी आहे. घटस्फोटानंतर गिरीश यांनी पल्लवीशी दुसरे लग्न केले. गिरीश आणि पल्लवी यांना दुर्गा ही मुलगी आहे.
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते. एका रिपोर्टनुसार, सिद्धार्थ चांदेकरने अनेक वर्षे मुग्धा परांजपे हिला डेट केले होते. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी ब्रेकअप केले. त्यानंतर सिद्धार्थने मिताली मयेकरला प्रपोझ केले आणि २४ जानेवारी, २०२१ ला ते दोघे लग्नबेडीत अडकले.
अभिनेता संग्राम समेळने २०१६ साली अभिनेत्री पल्लवी पाटीलशी लग्न केले होते. काही वर्षानंतर ते दोघे विभक्त झाले. त्यानंतर संग्रामने त्याची मैत्रीण आणि डान्सर श्रद्धा फाटकसोबत लग्न केले.
अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे यांचा नुकताच साखरपुडा पार पडला. याआधी सुयश अभिनेत्री अक्षया देवधर रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा होती.