Join us

महेश मांजरेकर यांची 'फिल्टर कॉफी', नाटकात झळकणार हे कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 16:57 IST

Filter Coffee Play: दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांनी ही 'फिल्टर कॉफी' नाट्यरसिकांसाठी आणली आहे.

कॉफीची नजाकत काही वेगळीच! मग ती कोल्ड असो वा हॉट! कॉफीच्या शौकिनांची संख्या कमी नाही. कॉफीचा खरपूस दरवळ जसा घरभर पसरतो, तसाच आता  रंगभूमीवर कॉफीचा दरवळ पसरणार आहे. दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी ही 'फिल्टर कॉफी' (Filter Coffiee Marathi Play) नाट्यरसिकांसाठी आणली आहे. अद्वैत आणि अश्वमी  थिएटर्स  प्रकाशित महेश वामन मांजरेकर सादर करीत असलेली ही तजेलदार फिल्टर कॉफी ६ एप्रिलला रंगभूमीवर येणार आहे. रितीशा प्रोडक्शन्स निर्मित महेश वामन मांजरेकर लिखित दिग्दर्शित  फिल्टर कॉफी’ या नाटकांचे निर्माते  दिलीप माधव जगताप असून सहनिर्माते राहुल भंडारे आहेत. नाटकात विराजस कुलकर्णी, विक्रम गायकवाड, कुणाल मेश्राम, अंकिता लांडे आणि उर्मिला कानिटकर यांच्या भूमिका आहेत. 

महेश मांजरेकर म्हणाले, ''१९९२ साली मला हे नाटक करायचं होतं. त्यावेळी ते शक्य झालं नाही आता हे नाटक मी आणलं असून ते स्वतः दिग्दर्शित करतोय. कॉफीच्या गडद रंगाप्रमाणे या नाटकाची गडद शेड नाट्यरसिकांना अनुभवायला  मिळेल. सस्पेन्स थ्रिलर असं हे नाटक आहे. मराठी नाट्यरसिक प्रगल्भ आहे. वेगळ्या संहिताचं स्वागत त्यांनी नेहमीचं  केलं आहे. माझ्या सोबतीने निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञ अशी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आणलेली कडू गोड चवीच्या 'फिल्टर कॉफी' ची ट्रीट नाट्यरसिक नक्कीच एन्जॉय करतील.'' 

थ्रिलर जॉनरची 'फिल्टर कॉफी'

या नाटकाविषयी बोलताना अभिनेता विराजस कुलकर्णी म्हणाला की, नाटक हे नेहमी दिग्दर्शकाचं मानलं जातं. दिग्दर्शकाच्या नावामुळे नाट्यरसिक नाटक पाहायला येतात. महेश मांजरेकर याचं नाव त्यात अग्रस्थानी आहे. त्यांच्या कलाकृती पाहत मी मोठा झालोय. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दवडणे शक्य नव्हतं. आम्ही घेऊन येत असलेलं हे नाटक थ्रिलर जॉनरच असून काहीतरी वेगळं नाट्यरसिकांना पाहायला मिळणार याची खात्री देतो. माझी ही पहिली नाट्यकृती असून महेश मांजरेकर यांच्यासारख्या दिग्ग्ज दिग्दर्शकासोबत काम करणं ही माझ्यासाठी पर्वणी होती. या नाटकाच्या निमित्ताने माझी नाटक करायची इच्छा पूर्ण झाली याचा आनंद असल्याचे अभिनेत्री उर्मिला कानिटकर हिने यावेळी सांगितले. 

'फिल्टर कॉफी' या नाटकाचे सहलेखन अभय देखणे सहाय्यक दिग्दर्शक सुरज कांबळे आहे. संगीताची जबादारी हितेश मोडक यांनी सांभाळली आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे तर नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. वेशभूषा लक्ष्मण येलप्पा गुल्लार यांची आहे. दिपक कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य या नाटकासाठी लाभले आहे.

टॅग्स :महेश मांजरेकर उर्मिला कानेटकर कोठारे