Join us

‘टेक केअर गुड नाइट’मध्ये महेश मांजरेकर यांची विशेष भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 5:11 PM

गिरीश जयंत जोशी दिग्दर्शित ‘टेक केअर गुड नाईट’ चित्रपट ३१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

ठळक मुद्देआजपर्यंतच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका - महेश मांजरेकरसायबर गुन्ह्यांबद्दल वेगळाच दृष्टीकोन मिळणार - मांजरेकर

भारतीय चित्रपटसृष्टील आघाडीचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर हे ‘टेक केअर गुड नाईट’मध्ये एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सामाजिक संदेश देणाऱ्या या चित्रपटाची पटकथा वाचल्यावर त्यांनी स्वतःहून हीच भूमिका करणार असल्याचे लेखक-दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी यांना सांगून टाकले होते.

स्वतःच्या प्रत्येक चित्रपटातून काहीतरी सामाजिक संदेश असावा असा प्रयत्न करणाऱ्या मांजरेकर यांनी सायबर गुन्हेगारीवर भाष्य करणाऱ्या आणि या गुणांमुळे सामाजिक व कौटुंबिक असे कोणते दुष्परिणाम उद्भवतात, हे प्रभावीपणे मांडणाऱ्या अशा या चित्रपटाशी जोडले जाण्याचा म्हणूनच जाणीवपूर्वक निर्णय घेतला.‘टेक केअर गुड नाईट’ हा गिरीश जयंत जोशी दिग्दर्शित चित्रपट ३१ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. महेश मांजरेकर यांच्यासह या चित्रपटात सचिन खेडेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्ण पेठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची प्रस्तुती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट असून निर्मिती हिमांशू केसरी पाटील (एस पी एंटरटेन्मेंट) आणि महेश मांजरेकर यांनी केली आहे.

महेश मांजरेकर, सचिन खेडेकर आणि गिरीश जयंत जोशी यांनी काही वर्षांपूर्वी ‘काकस्पर्श’ हा पुरस्कार विजेता चित्रपट एकत्र केला होता. तेव्हाच या तिघांमध्ये पुन्हा एखादा चित्रपट एकत्रित करण्याचे ठरले होते. जेव्हा जोशी यांनी या दोघांना ‘टेक केअर गुड नाईट’ची कथा ऐकवली तेव्हा या दोघांनीही लगेच होकार दिला. दोघांनाही की कथा आवडली होती. सचिन खेडेकर यांच्या मध्यवर्ती भूमिकेबरोबरच महेश मांजरेकर यांची वेगळी भूमिका यात असल्याने या चित्रपटाबद्दल चित्रपटसृष्टीत उत्कंठा आहे.

“टेक केअर गुड नाईट’ची कथा हे तुमच्या आमच्या दैनंदिन आयुष्यात घडणारी आहे. कोणत्याही तंत्रज्ञानाला सरावलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबात अशाप्रकारच्या सायबरशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्या मांडताना हा चित्रपट त्यावरील उपाय आणि बऱ्या-वाईट गोष्टींबद्दल भाष्यही करतो. हा सामाजिक संदर्भ ध्यानात घेवून मी या चित्रपटात काम करायचे ठरवले. मी यात साकारलेली भूमिका ही फारच आव्हानात्मक आणि मी आजपर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. सायबर गुन्ह्यांबद्दल एक वेगळाच दृष्टीकोन हा चित्रपट आपल्याला देऊन जातो,” असे महेश मांजरेकर म्हणतात.

टॅग्स :महेश मांजरेकर