सध्या सोशल मीडियावर केवळ एकाच गोष्टीची चर्चा आहे आणि ती म्हणजे पाताल लोक वेबसिरिज... ही वेबसिरिज लोकांना प्रचंड आवडत असून या वेबसिरिजची तुलना चक्क सेक्रेड गेम्ससोबत केली जात आहे. या वेबसिरिजची कथा प्रेक्षकांना प्रचंड ावडत आहे. त्याचसोबत या वेबसिरिजमधील सगळ्याच कलाकारांच्या अभिनयची चर्चा रंगली आहे. मुख्य भूमिकेत असणाऱ्या कलाकारांसोबतच सहकलाकारांच्या अभिनयाचे देखील कौतुक केले जात आहे.
पाताल लोकमधील चीनी ही तृतीयपंथीयाची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. एका व्यक्तीच्या खुनाच्या गुन्ह्यात चार जणांना अटक करण्यात येते. या चार जणांमध्ये चीनीचा समावेश असतो. चीनी ही एक तृतीयपंथी असली तरी ती सुरुवातीला एक मुलगी असल्याचेच सगळ्यांना भासवत असते. पण काही काळानंतर तिच्याविषयी सगळ्यांना कळते. एका तृतीयपंथीचा लहानपणापासूनचा संघर्ष, तिच्यावर झालेले लैंगिक अत्याचार, पैसे कमवण्यासाठी तिची सुरू असलेली मेहनत, अटक करण्यात आल्यानंतर तिच्या मनाची झालेली घालमेल या गोष्टी या वेबसिरिजमध्ये खूपच चांगल्याप्रकारे दाखवण्यात आलेल्या आहेत.
पाताललोक या वेबसिरिजमध्ये चीनी ही व्यक्तिरेखा मैरेमबाम रोनाल्डो सिंगने साकारली असून त्याने या व्यक्तिरेखेला खूपच चांगल्याप्रकारे साकारले आहे. फिल्म कॉम्पॅनियनला कास्टिंग डायरेक्टर आणि अनमोल आहुजाने दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, मैरेमबाम हा खऱ्या आयुष्यात तृतीयपंथी असून तो मणिपूर येथे राहातो. तो अनेक वर्षांपासून मणिपूरी नाटकांमध्ये काम करत आहे. या वेबसिरिजमध्ये महिला पोलिसाच्या भूमिकेत असलेल्या निकिता ग्रोव्हरमुळे आम्हाला मैरेमबामविषयी कळले. या भूमिकेसाठी आम्हाला एका मणिपुरी कलाकाराचीच गरज होती. निकिता मणिपूरला गेली असता तिने तेथील काही नाटकांच्या ग्रुपना भेटी दिल्या होत्या. त्यात तिला मैरेमबामविषयी कळले. तिच्यामुळे या वेबसिरिजच्या टीममध्ये त्याची एंट्री झाली.