झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेनं गेली दीड वर्ष प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. मालिकेतील नेहा व यशची रोमॅन्टिक केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. छोट्याशा परीला मात्र प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. या मालिकेतून श्रेयस तळपदे (Shreyas Talpade), प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere ), मायरा वैकुळ घराघरात पोहचले. मात्र आता ही मालिका संपलीये. होय, आज रात्री या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होणार आहे. साहजिकच प्रेक्षक निराश आहेत. यश आणि नेहाला निरोप द्यायला चाहते तयार नाहीत. प्लीज मालिका बंद करू नका म्हणून असंख्य चाहते विनंती करत आहेत. अशात श्रेयस तळपदेच्या एका पोस्टने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. होय, मालिका बंद होणार म्हणून निराश झालेल्या चाहत्यांना श्रेयसने एक गुडन्यूज दिली आहे.
होय, श्रेयसने मालिकेच्या शेवटच्या दिवसाच्या शुटिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये श्रेयय सेटवर सगळ्यांची भेट घेताना दिसत आहे. व्हिडीओद्वारे त्याने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. पण या व्हिडिओला श्रेयसने दिलेलं कॅप्शन वाचून चाहते नक्कीच सुखावणार आहेत.
शो संपतोय….“शो संपतोय….आपलं नात नाही….आपली ही रेशीमगाठ अशीच कायम राहणार आहे…वर्षानुवर्ष…कारण आम्ही लवकरच काहीतरी नवीन घेवुन येऊ….फक्त तुमच्यासाठी….आणि म्हणूनच कोणीतरी म्हंटलय….*Picture* अभी बाकी है मेरे दोस्त….कुछ समझे??'', असं श्रेयसने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. प्रार्थनाने सुद्धा याच सेम कॅप्शनसह एक व्हिडीओ शेअर केला आहे. श्रेयस व प्रार्थनाने लिहिलेल्या या कॅप्शनमुळे मालिकेचा दुसरा सीझन लवकरच येणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.श्रेयसने दिलेलं कॅप्शन काळजीपूर्वक वाचलं असेल तर एक गोष्ट नक्कीच तुमच्या लक्षात आली असावी. ती म्हणजे, *Picture* हा शब्द. या शब्दावरून कदाचित नेहा व यशची लोकप्रिय जोडी लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर बघायला मिळू शकते. अर्थात श्रेयसने अधिकृतपणे याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. नेमकं काय आहे, ते लवकरच कळेलच.
'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेचा शेवटचा एपिसोड आज रविवारी म्हणजेच २२ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. तर मालिकेचं शूट देखील नुकतंच संपलं आहे. मालिकेत श्रेयसने यशवर्धन चौधरी ही भूमिका साकारली होती. तर नेहाची भूमिका प्रार्थना बेहरेनं जिवंत केली होती. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून श्रेयस आणि प्रार्थना बेहेरेने अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं होतं.