झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath ) या मालिकेनं अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंस केलं. मालिका आली आणि तुफान लोकप्रिय झाली. मालिकेतील प्रार्थना बेहरे ( Prarthana Behere) व श्रेयस तळपदेची (Shreyas Talpade) रोमॅन्टिक केमिस्ट्रीही तुफान हिट ठरली. इतकी की, काही महिन्यांआधी या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र प्रेक्षकांच्या मागणीमुळे मालिका पुन्हा एकदा सुरू झाली. परंतु आता नव्याने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ बंद होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे आणि यामुळे मालिकेचे चाहते भडकले आहेत.
आता ही चर्चा कुठून सुरु झाली तर एका नव्या मालिकेच्या प्रोमोने या चर्चेला सुरुवात झाली. ‘36 गुणी जोडी’ या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि प्रेक्षकांचा संताप पाहायला मिळाला. ‘36 गुणी जोडी’ ही मालिका झी मराठीवर येत्या 23 जानेवारीपासून सोमवार ते शनिवारी संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होत आहे. सध्या याच वेळेत ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रसारित होते. त्यामुळे ही मालिका बंद होऊन त्याजागी ‘36 गुणी जोडी’ ही मालिका सुरू होत असल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ बंद होणार असल्याची कुठलीही अधिकृत माहिती झी मराठीने दिलेली नाही. पण नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झाल्यापासून ‘माझी तुझी रेशीमगाठ’ निरोप घेणार, असं लोकांनी मानलं आहे. त्याचमुळे चाहते संतापले आहेत.
‘तुम्ही माझी तुझी रेशीमगाठ’ बंद केली तर आम्ही झी मराठी पाहणंच बंद करू,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. प्लीज, माझी तुझी रेशीमगाठ बंद करू नका, अशी विनंती अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये केली आहे. ‘परत आवाज दाखवण्याची वेळ आली आहे. माझी तुझी रेशीमगाठ 8.30 वाजता चालू करावी,’अशी कमेंट एका युजरने केली आहे. आम्ही फक्त ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेसाठी झी मराठी बघतो, बंद करायच्या तर अन्य मालिका बंद करा, असंही अनेकांनी म्हटलं आहे. खरंच माझी तुझी रेशीमगाठ मालिका बंद करणार का असा सवालही प्रेक्षक करत आहेत.एकंदर काय तर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेवरचं प्रेम प्रेक्षकांनी व्यक्त केलं आहे. आता वाहिनी या मालिकेबद्दल काय निर्णय घेते, ते बघूच.
36 गुणी जोडी मालिकेबद्दल...
‘36 गुणी जोडी’ या मालिकेत अभिनेता आयुष संजीव आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे ही नवीकोरी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आयुष याआधी ‘बॉस माझी लाडाची’ या सोनी मराठीवरील मालिकेत दिसला होता. तर अनुष्का याआधी झी मराठीवरीलच ‘कारभारी लयभारी’ मालिकेत झळकली होती.