नववर्षातील पहिला हिंदू सण मकरसंक्रांत संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जात आहे. अनेक सेलिब्रिटींची यंदा लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत आहे. मराठी सिनेसृष्टीतील कलरफूल अभिनेत्री पूजा सावंतही लग्नानंतरची तिची पहिली मकरसंक्रांत साजरी करत आहे. पूजा पती सिद्धेशसह ऑस्ट्रेलियात मकरसंक्रांत साजरी करत आहे. याचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे.
पूजाने सिद्धेशसह पारंपरिक पद्धतीने ऑस्ट्रेलियातील तिच्या राहत्या घरी मकरसंक्रांत साजरी केली. पूजाने लग्नानंतरच्या पहिल्या मकरसंक्रांतीसाठी काळ्या रंगाची पैठणी नेसली होती. हलव्याचे दागिने घालत तिने पारंपरिक अस्सल मराठमोळा साजही केला होता. तर सिद्धेशने काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. यावेळी पूजाची आई, बाबा, बहीण आणि भाऊही उपस्थित होते. "लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत ॲास्ट्रेलियात", असं म्हणत पूजाने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
पूजाने गेल्या वर्षी २८ फेब्रुवारीला सिद्धेश चव्हाणसह सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली. मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. सिद्धेश हा डिस्नी कंपनीत कामाला आहे. तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला असतो. त्यामुळे लग्नानंतर पूजादेखील ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली आहे.