Join us

मकरंद अनासपुरे दिग्दर्शित ‘काळोखाच्या पारंब्या’ची ब्रूकलिन फिल्म फेस्टीव्हलसाठी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 20:17 IST

गेल्यावर्षी कोरोनाचे संकट कोसळण्यापूर्वी सातारा जिल्ह्यातील एका गावात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते.

अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘काळोखाच्या पारंब्या’ चित्रपटाची न्यूयॉर्क येथे होणाऱ्या २४व्या ब्रूकलिन फिल्म फेस्टीव्हलसाठी निवड झाली आहे. ४ ते १३ जून कालावधीत हा फेस्टीव्हल होत आहे. ९३ देशांतून आलेल्या २५०० चित्रपट निवडीच्या स्पर्धेत होते. त्यात काळोखाच्या पारंब्याची निवड झाली आहे.

प्रख्यात लेखक भारत सासणे यांच्या ‘डफ’ या दीर्घकथेवर हा चित्रपट आधारित आहे. वासना, लोभामुळे एखाद्या उमलत्या आयुष्याची कशी वाताहत होत जाते. संयम, संस्कार जीवनात किती महत्वाची बाब आहे, असे ‘काळोखाच्या पारंब्या’मध्ये अनासपुरे यांनी अतिशय प्रभावीपणे अधोरेखित केले आहे. त्यात मकरंद यांनी रहिमचाचाची मध्यवर्ती भूमिकाही साकारली असून त्यांच्यासोबत वैभव काळे, काजल राऊत या तरुण, नव्या उमेदीच्या कलावंतांसह पुरुषोत्तम चांदेकर, प्रा. डॉ. राजू सोनवणे, प्रेषित रुद्रवार आदींच्या प्रमुख भूमिका आहे. 

विशेष म्हणजे या चित्रपटाचे शिर्षक अभिनेते नाना पाटेकर यांनीच सुचवले होते. पटकथा व संवाद श्रीकांत सराफ - हेमंत पाटील यांचे असून कला दिग्दर्शन प्रशांत कुंभार, रंगभूषा कुंदन दिवेकर, वेशभूषा गोरल पोहने यांची आहे. गेल्यावर्षी कोरोनाचे संकट कोसळण्यापूर्वी सातारा जिल्ह्यातील एका गावात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. यापूर्वी ‘काळोखाच्या पारंब्या’चे सिनेमॅटोग्राफर सुरेश देशमाने यांना मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार मिळाला आहे. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्येही या चित्रपटाची निवड झाली आहे.

मराठी साहित्याची ताकद सिद्ध होते

मकरंद अनासपुरे यांनी आनंद व्यक्त करताना म्हटले की, ब्रूकलिन फिल्म फेस्टीव्हलसाठी निवड होणे, हे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. मराठी कलावंतांनी केलेल्या मेहनतीला दाद मिळते आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी साहित्याची ताकद यातून सिद्ध होते. मराठीतील सशक्त कथा-कादंबऱ्यांचे सिनेमात रुपांतर केले तर जागतिक पातळीवर त्याची नोंद घेतली जाते.

टॅग्स :मकरंद अनासपुरे