गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन केलं आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच यातील जेठालाल, दयाबेन, बबिता, सेक्रेटरी भिडे अशा काही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतल्या आहेत. यात खासकरुन जेठालालची सोशल मी़डियावर कायम चर्चा होत असते. त्यामुळेच जेठालालचे अतरंगी स्टाइलचे शर्ट कोण डिझाइन करतं हे जाणून घेऊयात.
या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचं एक वैशिष्ट्य आहे. यात जेठालाल खासकरुन त्याची गुजराती स्टाइल, गुजराती जेवणाची आवड आणि हटके शर्टच्या स्टाइलमुळे चर्चेत येत असतो. प्रत्येक सण, उत्सवाप्रमाणे त्याचे शर्ट हे डिझाइन केलेले असतात. त्यामुळे या मालिकेत त्याचे हे खास शर्ट कोण डिझाइन करतं हा प्रश्न अनेकांना पडतो.
कोण करते जेठालालचे कपडे डिझाइन?
गेल्या १४ वर्षांपासून मुंबईतील जीतू भाई लखानी हे जेठालालचे कपडे डिझाइन करतात. विशेष म्हणजे हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून जीतू भाईच जेठालालचे कपडे तयार करत आहेत. त्यामुळे कार्यक्रमात एखाद्या नव्या भागाचं शूट करायचं असेल तर त्यांना काही काळ आधीच तयारी सुरु करावी लागते, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
एक शर्ट तयार करायला लागतो इतका वेळ
जेठालालचे शर्ट शिवायला २ तास लागतात. तर ते डिझाइन करण्यासाठी ३ तास. त्यामुळे एकंदरीत एक शर्ट तयार करायला त्यांना ५ तास लागतात. विशेष म्हणजे जेठालाल स्टाइलचे कपडे तयार करण्यासाठी अनेक जण जीतू भाईंकडे येतात आणि खास कपडे डिझाइन करायची मागणी करतात.