आमिर खानला (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. पण सगळ्या अपेक्षा फोल ठरल्या. सोशल मीडियावर बायकॉट ट्रेंड चालला अन् आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा दणकून आपटला. अनेक प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली. परंतु यानंतर ‘लाल सिंग चड्ढा’ ओटीटीवर रिलीज झाला आणि लोक या चित्रपटाच्या प्रेमात पडले. आता या सगळ्यावर ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये पाकिस्तानी सैनिकाची भूमिका साकारणारा अभिनेता मानव विज (Manav Vij) याने प्रतिक्रिया दिली आहे.
मानव विजची ‘तणाव’ ही वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली. या सीरिजनिमित्त ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत मानव ‘लाल सिंग चड्ढा’वर बोलला.
काय म्हणाला मानव विज?‘लाल सिंग चड्ढा’ला न बघताच लोकांनी बायकॉट केलं, मला याचं प्रचंड दु:ख झालं. पण आता ‘लाल सिंग चड्ढा’ ओटीटीवर रिलीज झाल्यावर अनेक लोकांचे मला मॅसेज येत आहेत. आम्हाला सिनेमा आवडल्याचं लोक सांगत आहेत. अनेकांनी मला माफी मागितली आहे. आम्ही हा सिनेमा थिएटरमध्ये बघायला हवा होता. बायकॉट ट्रेंडमुळे आम्ही हा सिनेमा थिएटरमध्ये पाहिला नाही, हा चित्रपट थिएटरमध्ये पाहायला हवा होता अशी हळहळ व्यक्त करत आहेत. पण या सगळ्याचा आता काय फायदा? माझी माफी कशाला मागता? त्यापेक्षा आमिरच्या अकाऊंटमध्ये 500 रूपये जमा करा. कारण तुमच्या मूर्खपणामुळे निर्मात्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे, असं मानव म्हणाला.
आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा गेल्या 11 ऑगस्टला रिलीज झाला होता. आमिरने मोठ्या ब्रेकनंतर या चित्रपटाद्वारे कमबॅक केलं होतं. या चित्रपटावर सुमारे 180 कोटी खर्च झाला होता. या चित्रपटाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा होत्या. पण आमिरची जुनी वादग्रस्त वक्तव्य उकरून काढत सोशल मीडियावर या चित्रपटाविरोधात बायकॉट मोहिम चालवली गेली. त्याचा चित्रपटाला मोठा फटका बसला. चित्रपटाने जेमतेम 70 कोटींची कमाई केली.