Join us

'मला खूप अपमानास्पद...', राज्यात ठाकरेंचं सरकार असताना बीएमसीनं पाडलं होतं कंगनाचं घर, आता खासदार होताच केलं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 12:19 PM

ठाकरे सरकारच्या काळात बीएमसीनं पाडलं होतं घर, खासदार होताच कंगनाचं मोठं विधान

बॉलिवूड क्वीन कंगना राणौतने तिच्या यशस्वी अभिनय कारकिर्दीनंतर आता राजकारणात प्रवेश केलाय.  अलीकडेच त्यांनी हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली. राजकारणात एन्ट्री घेण्यापुर्वीही कंगना कायम तिच्या राजकीय वक्तव्यांमुळे खूप चर्चेत राहिली. महाराष्ट्रातील राजकारणात मविआ सरकार असताना कंगनाचे उद्धव ठाकरे यांच्याशी खटके उडाले होते.  आता खासदार होताच कंगनाने मोठं विधान केलं आहे. 

नुकताच एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने 2020 मध्ये घडलेल्या घटनांचा उल्लेख केला. 2020 मध्ये मुंबईत सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी सुरू असताना कंगना रनौत आणि शिवसेना यांच्यात तणाव निर्माण झाला होता. 2020 मध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या मुंबईतील घरावर कारवाई केली होती. शिवसेना आणि कंगनामधील वादाने तेव्हा संपुर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यावर बोलताना कंगना म्हणाली, 'राजकारणातील प्रवेश 2020 च्या घटनेचा परिणाम नाही'.

हिमाचली पॉडकास्टमध्ये बोलताना कंगना राणौत म्हणाली, 'मला खूप अपमानास्पद वाटलं होतं. माझ्यावर मोठी हिंसा झाल्यासारखं वाटलं होतं. माझं घर पाडण्यात आलं. त्यावेळी मला तो वैयक्तिक हल्ला वाटला. त्या घटनेवरून हे समजलं की महाराष्ट्रातून आणि देशभरातून मला मोठ्या प्रमाणात लोकांनी साथ दिली. लोकांनी मला मी धैर्यवान असल्याचं सांगितलं. त्या घटनेची एक खास फॅन फॉलोइंग आहे'. 

शिवाय, कंगनाने आयुष्यात काहीही नवीन करण्याची माझी कल्पना कोणाबद्दलच्या कटुतेतून आलेली नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच 2019 मध्येच राजकीय प्रवेशाची मला विचारणा करण्यात आल्याचंही कंगनाने सांगितलं. यासोबतच अमिताभ बच्चन यांच्यानंतर कोणाला सर्वात जास्त सन्मान आपल्याला मिळाल्याच्या वक्तव्यावरही आपण ठाम असल्याचं ती म्हणाली. सध्या सर्वत्र कंगनाचीच चर्चा रंगली आहे.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर,  लवकरच तिचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  या सिनेमात कंगना ही माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट इंदिरा गांधींनी 1975 मध्ये लादलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. अनुपम खेर, श्रेयस तळपदे, सतीश कौशिक आणि महिमा चौधरीसारखे दिग्गज कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत.  

टॅग्स :कंगना राणौतसेलिब्रिटीबॉलिवूडमहाराष्ट्रशिवसेनामुंबई