>>मयुरी वाशिंबे
फरहान अख्तर (Farhan Akhtar) निर्मित आणि रिमा कागती (Reema Kagti) दिग्दर्शित 'सुपरबॉईज ऑफ मालेगाव' (Superboys of Malegaon) सिनेमाचं सध्या सगळीकडे कौतुक होत आहे. नासिर शेख यांच्या जीवनावर आधारित हा एक प्रेरणादायी चित्रपट आहे. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात विनीत कुमार सिंग, आदर्श गौरव आणि शशांक अरोरा या त्रिकूटासोबत एक मराठमोळी लेक मंजिरी पुपाला (Manjiri Pupala) झळकली आहे. सध्या मंजिरी पुपालाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' या मराठी मालिकेतून घराघरात पोहचलेली 'निशा' ते आज 'सुपरबॉय ऑफ मालेगाव'मधील तृप्ति बनून मंजिरी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. एवढंच नाही तर ती अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरीसोबत 'धडक २'मध्ये झळकणार आहे. सध्या मंजिरी 'सुपरबॉय ऑफ मालेगाव' चित्रपटाच्या यश आनंद घेतेय. यानिमित्त मंजिरीनं 'लोकमत फिल्मी'शी दिलखुलास संवाद साधला.
तुझ्या 'सुपरबॉय ऑफ मालेगाव' चित्रपटाचं सर्व स्तरामधून कौतुक होतंय, सिनेमाला एवढं यश मिळालं. कसं वाटतंय?
मला वाटतं यशाची संकल्पना खूप वेगळी असते. चित्रपट छान चालतोय. खूप मजाही येतेय. आमच्या सर्व टीमला या गोष्टीचा आनंद होतोय. चित्रपट प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहचतोय. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून संघर्षाची ही सगळी वर्ष माफ आहेत असं वाटतं. एक कलाकार म्हणून इतक्या वर्षांचा खडतर प्रवास सार्थ झाल्याचं वाटतं. आपण जे काही बनवतोय, ते प्रेक्षकांसमोर इतक्या सुंदर पद्धतीने पोहचतंय हे पाहून छान वाटतं.
'सुपरबॉय ऑफ मालेगाव' या चित्रपटात संधी कशी मिळाली?
'शहर लखोट' नावाच्या वेबसीरिजसाठी मी काम करत होते. त्याचं शूट संपल्यावर मी हॉलिडेवर गेले होते. तर तिकडे पोहचताच, मला ऑडिशनसाठी मेसेज आला. अॅमेझॉन स्टुडिओचं प्रोजेक्ट आहे, लेखन वरुण ग्रोवरने केलं आहे आणि दिग्दर्शक रीमा कागती असणार आहेत, असं मेसेजमध्ये लिहलेलं होतं. या सर्व गोष्टी माझ्यासाठी फार महत्त्वाच्या होत्या. मी अगदी त्या संध्याकाळीच मुंबईला परतले आणि त्या ऑडिशनसाठी तयारी केली. ऑडिशनसाठी माझ्याकडे एक दिवस होता. नंदीनी, श्रीकांत, करण यांनी माझं ऑडिशन घेतलं होतं. सिनेमातील पात्र ही डॉक्यूमेंटरीवर आधारित आहेत. सर्व पात्र खरी आहेत. त्यात फक्त माझं पात्र हे पुर्णपणे काल्पनिक होतं. त्यामुळे ते मुलीचं पात्र खरं वाटलं पाहिजे, याची जबाबदारी घेत त्यांनी माझ्याकडून दोन ते तीन महत्वाच्या सीनचं ऑडिशन घेतलं होतं.
सेटवरचा अनुभव कसा होता?
जवळपास तीन महिने आम्ही शुटिंग करत होतो. सेटवरचा अनुभव खूप छान होता. सिनेमाचं लेखन वरुण ग्रोवर (Varun Grover) यांनी केलं होतं. ते ज्या पद्धतीने सिनेमाचं लिखाण करतात, गाणी लिहतात, त्यांचं काम मला फार आवडतं. आमच्या दिग्दर्शक रिमा कागती यांचे चित्रपट आणि वेब शो मला प्रचंड आवडतात. तर स्वप्नील सोनावणे यांनी सिनेमॅटोग्राफी यांनी केली. ते अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांच्या कॅमेऱ्यामधून गोष्ट दाखवतात. त्यांच्या लेन्समधून लोकांपर्यंत पोहचणार ही सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. आपल्या देशातील जे सर्वोत्कृष्ट कलाकार आहेत, त्यांच्यासोबत मला काम करायला मिळतंय आणि खांद्याला खांदा लावून मी सेटवर उभी आहे, हीच गोष्टी माझ्यासाठी मोठी होती. विनित कुमार सिंग यांच्याबरोबर मी बेतालमध्ये काम केलं होतं. शंशाक आणि आदर्श हे चांगले अभिनेते आहेत. त्याच्याबरोबरीने उभे राहून अभिनय करणं माझ्यासाठी खूपच चांगली गोष्ट होती. त्यामुळे हे काम करताना मला खूप मजा आली.
मराठीनंतर आता बॉलिवूडमध्ये काम करण्याचा अनुभव कसा आहे?
माझं आडनाव हे पुपाला आहे. त्यामुळे खूप लोकांना वाटतं की मी महाराष्ट्रीयन नाही. हिंदी इंडस्ट्रीमध्ये जेव्हा मी काम केलं. तेव्हा मला फक्त मराठी भुमिकांच्या ऑफर आल्या नाहीत. मला वेगवेगळ्या ठिकाणचे पात्रे साकारण्यास मिळाली. 'बेताल'मधील पात्र छत्तीसगढमधील होतं. नंतर मी एक चित्रपट केला 'गॅसलाईट', तो गुजरातमधील होता. त्यानंतर 'शहर लखोट' आणि 'दहाड'मधील पात्र ही राजस्थानमधील होती. मला नेहमी भारतातील वेगवेगळ्या राज्यातील पात्र साकारण्यास मिळतात. सिनेमात एखादा मराठी रोल असेल तरीही मला विचारलेलं नाही. त्यामुळे मला त्या राज्यातील भाषांचा अभ्यास करुन ते पात्र साकारण्याची संधी मिळाली. कारण, बऱ्याचदा असं होतं हिंदी इंडस्ट्रीमध्ये मराठी म्हटलं की मराठमोळे रोल ऑफर केले जातात. तर ती गोष्ट माझ्याबाबतीत झाली नाही. ही वेगवेगळी पात्र मी साकारू शकले. क्लट क्लासिक होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रपटात याचा मला अभिमान आहे.
आता पुन्हा तुला जर एखाद्या मराठी चित्रपटांची ऑफर आली तर काम करणार का?
अगदीच करणार. मला मराठीत काम करण्याची इच्छा होते. मला मराठी सिनेमे खूप आवडतात. मराठीत खूप चांगले चित्रपट येत आहेत. विनोद कांबळी यांचा 'कस्तुरी' चित्रपट आहे. जयंत सोमलकर यांचा 'स्थळ' नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. नागराज मंजुळे यांचे वेगळ्या धाटणीचे चित्रपट आहेत, ज्यांचं संपुर्ण देशभरात कौतुक झालं. तर मला असं वाटतं मराठीत वेगवेगळे नावीन्यपुर्ण प्रयोग होतात. विशेष म्हणजे मराठीत ९० टक्के लोक हे थिएटर पार्श्वभूमी असलेली आहेत. कारण, महाराष्ट्राला एवढी मोठी नाट्यसंस्कृती लाभलेली आहे. मी स्वत:हा नाटकांमधून सुरुवात केली होती. पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासोबतचं 'जाऊ बाई जोरात' हे माझं पहिलं नाटक होतं. त्यामुळे जर मला एखादी मराठी चित्रपट मिळाला तर तो करायला आवडेल.
'दिल दोस्ती दुनियादारी' या मराठी मालिकेतील 'निशा' आणि आज 'सुपरबॉय ऑफ मालेगाव'मधील तृप्ति, मराठी मालिका ते बॉलिवूड चित्रपट असा पल्ला तू गाठला आहेस, याबद्दल काय सांगशील?
हो नक्कीच अभिमान वाटतो. एक कलाकार म्हणून माझ्या वाट्याला भुमिकांबद्दल मला आनंद होतो. त्यामुळे तृप्त होऊन एका ठिकाणी थांबले नाही आणि या गोष्टीचं आता मला समाधान आहे. कारण, जर मी 'दिल दोस्ती दुनियादारी'मध्ये निशा नसते आणि एखाद्या मुख्य भुमिकेत असते किंवा टेलिव्हिजनवर एवढे लोक मला ओळखतात, असं म्हणत थांबले असते, तर मी एवढी मेहनत घेतली नसती. हिंदी इंडस्ट्रीमध्ये स्वत:चा पाया मजबूत करायला मी प्रचंड मेहनत घेतली आहे. कुठेतरी माझी भूक अर्धवट राहत गेली. ज्यातून मी आणखी जास्त काम करु शकते, असं मला वाटतं गेलं. त्यामुळे मी प्रयत्न सुरू ठेवले, मेहनत थांबवली नाही. 'दिल दोस्ती दुनियादारी'पासून सुरु झालेला हा प्रवास आज आंतराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलमध्ये दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटापर्यंत पोहचलाय. 'सेटल' झाले नाही, म्हणून मी हा अनुभव मी घेऊ शकले.
या क्षेत्रात नकारही पचवावे लागतात. त्याला तू कशी सामोरी जाते?
खूप दु:ख झालं, त्रास झाला. बऱ्याचदा माझ्यासोबत असं झालं. मराठी इंडस्ट्रीबाहेर काम शोधण्यामागे हेही एक कारण होतं. मला ज्या पद्धतीच्या भुमिका ऑफर झाल्या, त्या बऱ्याचदा वर्किंग क्लासच्या होत्या. माझा रंग सावळा आहे. सावळी अभिनेत्री आहे म्हटल्यावर एकाच दृष्ट्रीकोनातून पाहिल जायचं. संकुचित प्रवृत्तीलाही मी थोडी कंटाळले होते. मला असं वाटायचं की मी यापेक्षा जास्त चांगलं करु शकते. पण, ती संधी मला मिळत नाहीये. कारण, जे निर्णय घेणारे आहेत, ते माझ्या रंगापलाकडे माझं काम पाहात नाहीयेत. कदाचित ही त्यांची ही चूक नसेलही. एखाद्या पात्रासाठी कलाकार निवडताना बऱ्याच गोष्टी असतात. पण, एकापाठोपाठ अशा अनेक घटना घडल्या. मग मला असं वाटलं की माझी एनर्जी, माझं वय आणि वेळ या ठिकाणी थांबून फक्त नाही म्हणण्यात जात आहे. कारण, त्यांना माझ्या त्वचेच्या रंगापलिकडे पाहता येत नाहीये. जेव्हा मी 'बेताल' केला, तेव्हा तो भारतामधील पहिला झाँबी शो होता. त्यातील माझं काम लोकांना खूप आवडलं. तर मला मराठीमधील एका लोकप्रिय दिग्दर्शकाचा मला फोन आला. त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं. त्याचा एक नवा सिनेमा येणार होता. तर माझ्या सिनेमात तुला नक्की घेईल, असं ते मला म्हणाले. यानंतर जेव्हा त्यांच्या टीमकडून मला फोन आला आणि त्यांनी मला कामवाल्या बाईचा कॉमिक रोल ऑफर केला. मी त्यांना स्क्रीप्ट मागितली तर त्यांनी नकार दिला. मग मला वाटलं की मी अशा कुठल्यातरी गोष्टीला हो म्हणतेय, जे पात्र मला कसं आहे हेच माहितीही नाहिये. तर अशा प्रकराचे जे संकुचित दृष्ट्रीकोन होते, त्याचा मला खूप त्रास व्हायचा.
एक कलाकार म्हणून मला आव्हान पेलायला आवडतात. जोपर्यंत तुम्ही स्वत:साठी उभं राहणार नाही. तोपर्यंत कुणीच राहणार नाही. जर तुम्हाला कुणी सांगितलं की तुम्ही बदललं पाहिजे, तरच तुम्हाला काम मिळेल, तर हे चुकीच आहे. तुम्ही स्वत:वर काम करत राहिलं पाहिजे. पण, स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करु नये. तुम्ही जे आहात त्यासाठी तुम्हाला काम मिळणार आहे. पुर्णपणे तुम्ही स्व:ताला स्वीकारून स्वत:च्या प्रगतीवर काम करालं आणि योग्य वेळी हो म्हणायला आणि पटत नसेल तिथे नकार द्यायला शिकालं, तेव्हा एक व्यक्तीमत्त्व उभं राहातं.
इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउचबद्दल अनेक अभिनेत्री व्यक्त झाल्यात. हे अजूनही घडते का?
कास्टिंग काऊच हा जो प्रकार आहे. तो अत्यंत दुर्देवी आणि वाईट आहे. ज्या मुलींना या गोष्टींचा सामना करावा लागलाय, त्यांच्याशी माझी पुर्ण सांत्वना आहे. मला असं वाटतं मी टू मोहिमेनंतर गोष्टी बऱ्याच बदलल्या आहेत. आता लोक घाबरतात. त्यामुळं आता इंडस्ट्रीत जे स्वातंत्र्य निर्माण झालं आहे. त्याचा पुरेपुर उपयोग करुन घेतला पाहिजे असं मला वाटतं.
तु 'धडक २' मध्ये दिसणार आहेस? अनेकांना धर्मा प्रोडक्शनमध्ये काम करण्याची इच्छा असतेच, तुझी ही इच्छा पुर्ण झाली.
'सुपर बॉईज ऑफ मालेगाव'चा जर विचार केला तर एक्सल आणि टायगर बेबी प्रोडक्शन होतं. तर एमजीएम प्रोडक्शनचं (मेट्रो-गोल्डविन-मेयर) जे सिंहाचं चिन्ह आहे. ते मी लहानपणापासून पाहात आलेय. जेव्हा माझ्या सिनेमावर ते चिन्ह दिसलं, तेव्हा मला खूप आनंद झाला. तो स्वप्नपुर्ती झाल्याचा एक अनुभव होता. अगदी तसंच धर्मा प्रोडक्शनचं आहे. त्यांचा आयकॉनिक लोगो आणि गाणं चित्रपटात पाहात आलोय. ते एकदम बालपणीच्या आठवणीत घेऊन जातं. त्या वयाच्या मंजीरीला आता स्वत:ला मोठ्या पडद्यावर पाहण्याचा अनुभव मिळणार आहे.