पुण्याच्या सुप्रसिद्ध गायिका मंजुश्री ओक यांनी सलग साडेतेरा तास गायन करत भारतातील तब्बल १२१ भाषा, बोलीभाषा आणि उपभाषांमधील १२१ गाण्यांचे सादरीकरण केले. ओक यांच्या सादरीकरणाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये झाली आहे. या आधी ओक यांनी २०१७ व २०१८ अशी सलग दोन वर्षे ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ व ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्येदेखील प्रत्येकी दोन विक्रम नोंदविले आहेत.
२०१९ मध्ये या विक्रमासाठी त्यांनी कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे ‘अमृतवाणी - अनेकता में एकता’ या कार्यक्रमात प्रयत्न केला. याबद्दल ओक म्हणाल्या, लहानपणापासून अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असताना आपल्या संगीत क्षेत्रातील प्रयत्नांद्वारे देशासाठी काही तरी योगदान द्यावे, हा विचार मनात होता. याच दृष्टीने प्रयत्न करीत असताना श्री यशलक्ष्मी आर्टतर्फे आणि पद्मनाभ ठकार यांच्या विशेष सहकार्याने पुण्यात ‘अमृतवाणी - अनेकता में एकता’ हा कार्यक्रम केला.
वडील वसंत ओक यांच्याकडे त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरविले. नंतर पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडे त्या गाणे शिकल्या आहेत. लोकगीते, भक्तिगीतांसह विविध गीतप्रकारांचे सादरीकरण केले. २०१९ हे वर्ष ‘युनो’च्या वतीने ‘स्वदेशी भाषा वर्ष’ म्हणून जाहीर झाले असताना या प्रयत्नाने अनेकांपर्यंत पोहोचता आले आणि भारतीय भाषांची समृद्धी जगासमोर मांडता आली याचा अभिमान आहे.
या १२१ भाषांमध्ये उत्तर व दक्षिण भारतातील सर्व प्रमुख भाषांबरोबरच ईशान्य भारतातील बोलीभाषा, निकोबारी भाषा, हिंदीची उपभाषा असलेली भोजपुरी या भाषांचादेखील समावेश आहे. गाण्यांमध्ये पारंपरिक गीते, लोकगीते, भक्तिगीते, भावगीते, अभंग, देशभक्तिपर गीते, लावणी अशा विविध प्रकारांचा समावेश केल्याचे ओक यांनी सांगितले.