तमिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक मनोबला यांचे निधन झाले, ते ६९ वर्षांचे होते. लिव्हरसंबंधित आजारामुळे गेल्या २ आठवड्यांपासून त्यांच्यावर चेन्नईतील घरी उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची मृत्युशी झुंज संपली. येथील एल.व्ही. प्रसाद रोडवरील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनसाठी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी उषा आणि मुलगा हरिष हे दोघे आहेत.
मनोबला यांच्या निधनाच्या वृत्ताने तमिळ चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून सेलिब्रिटींकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक जीएम.कुमार आणि इंडस्ट्री ट्रेकर रमेश बाला यांनी ट्विट करुन मनोबला यांच्या निधनाचे वृत्त दिले. त्यानंतर, संपूर्ण साऊथ इंडस्ट्रीतील दिग्गजांकडून मनोबला यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
मनोबला यांचं ४५० पेक्षा जास्त चित्रपटात काम
अभिनेता मनोबला यांनी ४५० पेक्षा जास्त चित्रपटात अभिनय केला आहे. आपल्या कॉमेडी टायमिंगसाठी व सेल्फ डिप्रिकेटिंग ह्यूमरसाठी ते प्रसिद्ध होते. मनोबला यांनी १९७९ मध्ये भारतीराजा की पुथिया वरपुगल चित्रपटातून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली. याच वर्षात त्यांनी शंभराहून अधिक चित्रपटांत सपोर्टिंग रोल प्ले केले. त्यांची शेवटची ऑन-स्क्रीन प्रेजेंस काजल अग्रवालच्या घोस्टी या चित्रपटात होती.