Join us

'देवदास' रिजेक्ट केल्याचा मनोज वाजपेयींना होतोय पश्चाताप; 'या' भूमिकेसाठी मिळाली होती ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 1:43 PM

Manoj bajpayee: मनोज वाजपेयी यांना सगळ्यात आधी देवदास सिनेमाची ऑफर मिळाली होती. मात्र, त्यांनी कसलाही विचार न करता केवळ एका क्षुल्लक कारणावरुन तो रिजेक्ट केला.

भारतीय कलाविश्वातील लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेत्यांच्या यादीत मनोज वाजपेयी यांचं आवर्जुन नाव घेतलं जातं. नुकताच त्यांच्या कारकिर्दीतील त्यांचा १०० वा 'भैयाजी' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. मनोज यांनी आजवरच्या कारकिर्दीत अनेक सिनेमांमध्ये काम केलं. तर काही सिनेमा रिजेक्टही केले. मात्र, यात एक सिनेमा असा होता जो रिजेक्ट केल्याची सल आजही त्यांच्या मनात सलत आहे.

सध्या सोशल मीडियावर मनोज वाजपेयी यांची एक मुलाखत चर्चेत येत आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या करिअर, सिनेमा या सगळ्यांवर एकंदरीत भाष्य केलं. यावेळी बोलत असतांना त्यांनी 'देवदास' सिनेमा रिजेक्ट केल्याची खंत वाटत असल्याचं जाहीरपणे मान्य केलं.

संजय लीला भन्साळी यांचा 'देवदास' हा बॉलिवूडमधील आयकॉनिक सिनेमा ठरला आहे. ऐश्वर्या राय- बच्चन, शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर बराच गाजला. या सिनेमातील चुन्नीलाल या भूमिकेत अभिनेता जॅकी श्रॉफ झळकला आहे. परंतु, ही भूमिका प्रथम मनोज वाजपेयी यांना ऑफर झाली होती. मात्र, त्यांनी रिजेक्ट केली. यामागचं कारणही त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं.

'तुमच्या करिअरमधील असा कोणता सिनेमा आहे जो रिजेक्ट केल्याची खंत आजही तुम्हाला आहे?' असा प्रश्न मनोज यांना विचारण्यात आला. त्यावर, "हो. मला देवदासमध्ये जॅकी श्रॉफने साकारलेली भूमिका ऑफर झाली होती. पण, मी कसलाही विचार न करता तो रिजेक्ट केला. मी संजयला म्हटलं..अरे, संजय, देवदास करावा ही माझी खूप इच्छा होती. तो सिनेमा सुपरहिट ठरला. पण, मला आजही सिनेमा रिजेक्ट केल्याचा पश्चाताप होतोय", असं मनोज वाजपेयी म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "ज्यावेळी मी नाटकांमध्ये काम करायचो त्यावेळी दिलीप कुमारांचे चित्रपट पाहायचो. जेव्हापासून मी त्यांची भूमिका पाहिली होती आणि देवदासवर आधारित पुस्तकं वाचली होती तेव्हापासून मला देवदासची भूमिका साकारायची होती."

दरम्यान, जॅकी श्रॉफपूर्वी अनेक अभिनेत्यांनी चुन्नीलालची भूमिका रिजेक्ट केली होती. यात शेखर सुमनचाही समावेश आहे. बिझी शेड्युलमुळे त्यांनी ही भूमिका नाकारली होती. तसंच सैफ अली खान, गोविंदा यांनाही ही भूमिका ऑफर झाली होती.

टॅग्स :बॉलिवूडमनोज वाजपेयीसंजय लीला भन्साळीशाहरुख खानसिनेमा