मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारे अभिनेते मनोज जोशी (Manoj Joshi) सध्या त्यांच्या एका ट्विटमुळे चर्चेत आहेत. केवळ चर्चेत नाहीत तर या ट्विटमुळे सोशल मीडियावर त्यांना जबरदस्त ट्रोल केले जातेय.सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असलेले मनोज जोशी यांनी रविवारी कोरोनाच्या सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर एक ट्विट केले आणि क्षणात हे ट्विट व्हायरल झाले. आपल्या या ट्विटमध्ये मनोज जोशी यांनी अप्रत्यक्षपणे मुस्लिमांवर निशाणा साधला आहे. (Manoj Joshi gets brutally trolled over his communal tweet on corona virus)
‘जो घर-घर से अफजल निकाल रहे थे, वहां से कभी डॉक्टर भी निकालेंगे क्या?’ अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आणि त्यावरून खळबळ माजली. अनेक युजर्सनी त्यांच्या या ट्विटची तीव्र शब्दांत निंदा केली. अनेकांनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण देश कोरोनाशी लढत असताना मुस्लिमांविरूद्ध द्वेष पसरवणा-या त्यांच्या या ट्विटवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
‘शपथ घ्या की तुमच्या कुटुंबातील कोणी कोरोनाला बळी पडले तर ते कधीही सिप्लापासून बनवलेले रेमडेसेव्हिर घेणार नाही,’ असे एका युजरने त्यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना लिहिले. (या युजरने सिप्ला हे नाव घेतले कारण सिप्लाच्या मालकाचे नाव ख्वाजा अब्दुल हमीद आहे, जे मुस्लिम समुदायाचे आहेत.)‘या भयंकर संकटकाळात तुम्ही द्वेष पेरणार असाल, तर विश्वास ठेवा तुम्ही माणूस नाहीत. आपल्या देशात हजारो लोक आहेत जे डॉक्टर आहेत आणि चांगले मानवी सेवा करीत आहेत. उदाहरणार्थ, डॉ. कफील खान.,’अशा शब्दांत एका युजरने त्यांना फैलावर घेतले.