अभिनेत्री करिश्मा कपूर आणि उद्योजक संजय कपूर यांचा नुकताच अधिकृत घटस्फोट झाला. करिश्मा आणि संजय यांनी घटस्फोटाचा अर्ज २०१३ मध्ये दाखल केला असला तरी त्यांचा घटस्फोट व्हायला जवळजवळ तीन वर्षं लागली. करिश्माने घटस्फोटाच्या वेळी मुलांच्या पालनपोषणासाठी आणि तिच्या स्वत:च्या भविष्यासाठी काही ठरावीक रक्कम संजयकडून मागितली होती. ती रक्कम देण्यास संजयने नकार दिला होता. यावरून त्या दोघांमध्ये वाद सुरू होता आणि त्यामुळेच त्यांच्या घटस्फोटासाठी तीनपेक्षा अधिक वर्षांचा कालावधी लागला. घटस्फोटासाठी अनेक वर्षे कोर्टाची पायरी झिजवणारे या दोघांसारखेच अनेक सेलीब्रिटी बॉलीवूडमध्ये आहेत. त्यांच्या विभक्त होण्याची ही कथा...आदित्य चोप्रा - पायल खन्नाआदित्य चोप्रा आणि पायल खन्ना यांचा प्रेमविवाह होता. ते दोघे अतिशय लहान वयापासून एकमेकांना ओळखत होते. अनेक वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी कुटुंबांच्या संमतीने लग्न केले. पण २००९ साली त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. आदित्य हा यशराज बॅनरचा सर्वेसर्वा असल्याने पायलने घटस्फोटासाठी खूप मोठ्या रकमेची मागणी केली होती. सुरुवातीला ही अव्वाच्या सव्वा रक्कम द्यायला आदित्य तयारच नव्हता. या सगळ्यामुळे त्यांच्या घटस्फोटाची कारवाई दोन-तीन वर्षं सुरू होती. पण याच दरम्यान अभिनेत्री राणी मुखर्जी आदित्यच्या आयुष्यात आली होती. राणीसोबत आदित्यला आपला नवा संसार सुरू करायचा होता. घटस्फोट घेतल्याशिवाय राणीशी लग्न करणे शक्य नव्हते. यामुळे त्याने नाइलाजास्तव पायलला भली मोठी रक्कम दिली आणि त्यानंतर पायलने घटस्फोटासाठी होकार दिला, असे म्हटले जाते. युक्ता मुखी - प्रिन्स तुलीमिस वर्ल्ड युक्ता मुखी ही तिच्या चित्रपटांसाठी जितकी चर्चेत राहिली नाही, त्यापेक्षा कित्येक पटीने ती तिच्या घटस्फोट प्रकरणासाठी चर्चेत होती. तिचा विवाह उद्योजक प्रिन्स तुुलीसोबत झाला होता. पण त्यांचा घटस्फोट मीडियात प्रचंड गाजला होता. खरे तर युक्ता आणि प्रिन्स यांनी सामंजस्याने घटस्फोट घेतला. पण त्याआधी युक्ताने प्रिन्स आणि त्यांच्या कुटुंबीयाच्या विरोधात मारहाणीची तक्रार नोंदवली होती. युक्ता हे सर्व केवळ पैशांसाठी करत असल्याचे प्रिन्सच्या कुटुंबीयांचे म्हणणे होते. युक्ता आणि प्रिन्सच्या कुटुंबीयांचा वाद शिगेला पोहोचल्यानंतर प्रिन्सने माघार घेतली होती. त्याने युक्ताच्या काही मागण्या पूर्ण करून तिने पोलिसांकडे केलेली तक्रार मागे घ्यायला लावली. या मागण्यांमध्ये त्यांच्या मुलाचा ताबा हा युक्ताकडे राहील अशीदेखील एक मागणी होती. ओम पुरी - नंदिता पुरीओम पुरी आणि नंदिता पुरी यांनी लग्नाच्या २६ वर्षांनंतर घटस्फोट घेतला. नंदिता आणि ओम पुरी यांच्यातील भांडणे ओम पुरी यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या अनलाइकली हीरो : द स्टोरी आॅफ ओम पुरी हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर सुरू झाली. या पुस्तकात ओम पुरी यांच्या आयुष्यातील अनेक वैयक्तिक गोष्टी नंदिता यांनी त्या पुस्तकात लिहिल्या होत्या. या सगळ्यामुळे त्यांची छबी लोकांमध्ये वाईट झाली असल्याचे ओम पुरी यांचे म्हणणे होते. या दरम्यान ओम पुरी यांनी मारहाण केल्याची तक्रारही नंदिताने दाखल केली होती. पण काही काळानंतर त्या दोघांनी वाद न वाढवता एकमेकांच्या विरोधात पोलिसांमध्ये केलेल्या सगळ्या तक्रारी मागे घेतल्या आणि सामंजस्याने घटस्फोट घेतला.
- prajakta.chitnis@lokmat.com