Join us

Ketaki Chitale : मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेची सटकली, ट्रोल करणाऱ्याला चक्क शिवी हासडली...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2023 11:08 AM

Ketaki Chitale : होय, न्यू ईअर सेलिब्रेशन करतानाचा एक व्हिडीओ केतकीने शेअर केला आणि यानंतर अनेकांनी तिला जबरदस्त ट्रोल केलं. एका ट्रोलरची कमेंट वाचून मात्र केतकीची सटकली...

मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale)   तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी केतकी चितळेचा एक एपिसोड चांगलाच गाजला होता.  एका वादग्रस्त फेसबुक पोस्टमुळे केतकीला तुरुंगाची हवा खावी लागली होती. आता पुन्हा एकदा चर्चा आहे ती केतकीच्या नव्या पोस्टची. किंबहुना या पोस्टनंतर केतकीने एका ट्रोलरला दिलेल्या उत्तराची. होय, न्यू ईअर सेलिब्रेशन करतानाचा एक व्हिडीओ केतकीने शेअर केला आणि यानंतर अनेकांनी तिला जबरदस्त ट्रोल केलं. एका ट्रोलरची कमेंट वाचून मात्र केतकीची सटकली. या ट्रोलरला उत्तर देताना तिने चक्क शिवी हासडली.

आता ही काय भानगड आहे, ते जाणून घेऊ यात. तर झालं असं की, काल केतकीने न्यू ईअरचं जबदस्त सेलिब्रेशन केलं. याचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला. ‘माफ करा, पण कधीही विसरू नका... हॅप्पी न्यू इअर’, असं ती व्हिडीओत म्हणतेय. यात ती मद्यपान करताना दिसतेय. ‘मैं कट्टर सनातन हिंदू हूं लेकिन इसका मतलब यह नहीं की बाकी सब 100% गलत है,’असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. व्हिडीओत केतकीनं हातावरचा टॅटू फ्लॉन्ट केला आहे. तिच्या हातावर एक क्रमांक गोंदलेला दिसतोय. हा  तुरुंगात असताना तिचा ‘कैदी नंबर’ होता. त्याचाच टॅटू तिने काढला आहे. मी माफ केलं असलं तरी ते सगळं विसरलेली नाहीये, या संदर्भाने तिने हा टॅटू फ्लॉन्ट केला आहे.

केतकीने हा व्हिडीओ शेअर करताच काही जणांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. व्हिडीओत केतकी मद्यपान करताना दिसतेय, यावर लोकांनी आक्षेप नोंदवला. एका ट्रोलरने तिला हिंदू असण्याचं स्मरण करून देत ट्रोल केलं. ‘हिंदू आहेस ना, मग न्यू ईअरला हिंदू देवाला हात जोडतात... तू दारू पिताना व्हिडीओ काढतेय... खूप तरूण मुलं तुला फॉलो करत आहेत. काही चांगलं लोकांसमोर ठेव हीच अपेक्षा. हॅपी न्यू ईअर,’असं एका ट्रोलरने कमेंट बॉक्समध्ये लिहिलं.

ही कमेंट पाहून केतकीची सटकली. तिने त्याला चक्क शिवी देत उत्तर दिलं. ‘**** हे ग्रेगोरियन नववर्ष आहे. पंचागानुसार नवीन वर्ष नाही. अर्थात तुमच्या पिढीला हा साधा फरक माहित असण्याची अपेक्षा ठेवणं हा माझा मूर्खपणा आहे,’असं उत्तर तिने दिलं. सध्या तिच्या या उत्तराचीच चर्चा आहे.

टॅग्स :केतकी चितळेमराठी अभिनेता