Milind Gawali: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. या मालिकेत त्यांनी साकारलेल्या अनिरुद्ध नावाच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. अलिकडेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला तरी मिलिंद गवळी वेगवेगळ्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतात. आपल्या आयुष्यातील पडद्यावरील आणि पडद्यामागीलही अनेक गोष्टी ते चाहत्यांबरोबर शेअर करतात. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमुळे मिलिंद गवळी चर्चेत आले आहेत. या मुलाखतीमध्ये बहुचर्चित 'छावा' चित्रपटाबद्दल केलेल्या वक्तव्याने सगळ्यांचं लक्ष त्यांनी वेधलं आहे.
अलिकडेच मिलिंद गवळींनी 'स्टार विश्व' या चॅनेलसोबत संवाद साधला. त्यादरम्यान, त्यांनी 'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशलच्या अभिनयाची स्तुती केली. तेव्हा अभिनेते म्हणाले," कलाकार संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांना जपणं गरजेचं आहे. मी लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशल यांच्या मुलाखती ऐकत होतो. सिनेमा प्रदर्शित झाला, सुपरहिट झाला. तरीही लक्ष्मण उतेकर विकी कौशलला राजे-राजे म्हणत होते. म्हणजे त्या कलाकाराला त्या दिग्दर्शकाने राजे म्हणून राजांचा दर्जा दिला."
यापुढे मिलिंद गवळींनी म्हटलं, "त्या चित्रपटात विकी कौशलने जी भूमिका केली, ती राजांसारखी केली, असं मला वाटतं. त्यामुळे प्रत्येक दिग्दर्शकाने कलाकाराला त्याची संवेदनशीलता ओळखून, मार्गदर्शन करणं, जपणं गरजेचं आहे, असं वाटतं." असं त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. १४ फेब्रुवारी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 'छावा' चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. याशिवाय चित्रपटामध्ये आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत सिंह, डायना पेंटी, प्रदीप रावत, नील भूपालम, महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.