यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त १६५९ मध्ये शिवरायांनी अफझल खानाचा कोथळा ज्या वाघनखांनी काढला, ती वाघनखे ३ वर्षांसाठी महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. ही वाघनखे भारतात आणण्यासाठी यशस्वी सामंजस्य करार केल्याबद्दल भारतीय सिनेसृष्टीतील नामवंत निर्माते, प्रतिभासंपन्न दिग्दर्शक, अभिनेते यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार यांचा सत्कार देखील केला. वाघनखांबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. दरम्यान आता अभिनेता आस्ताद काळे (Aastad Kale)ने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टची चर्चा होत आहे.
आस्ताद काळेने फेसबुकवर पोस्ट शेअर करत लिहिले की, "वाघनखं" आपल्याकडे आली आहेत हे चांगलंच आहे. त्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचं मानापासून अभिनंदन आणि आभार. पण ती आपल्याला "देऊन टाकली" नाही आहेत याची कृपया नोंद घ्यावी या ठिकाणी. जगातील सर्व संग्रहालयं एकमेकांना स्वतःकडच्या वस्तू अशाप्रकारे काही काळापुरती देतच असतात. प्रचंड मोठी रक्कम डिपॉझिट म्हणून यासाठी घेतली जाते. कागदोपत्री खूप काटेकोर आणि कायदेशीर व्यवहार त्यासाठी केला जातो. आणि एक प्रामाणिक शंका आहे.
जाणकारांनी कृपया निरसन करावं. नतद्रष्ट अफझुल्याचं पोट फाडायला हीच वापरली होती, याचा ठोस काही पुरावा सादर झाला आहे का? हे मी जिन्युअनली विचारतोय. पुन्हा सांगतो, हा ऐतिहासिक ठेवा आत्ता स्वगृही असल्याचा आनंद निश्चितच आहे, असे त्याने पुढे पोस्टमध्ये लिहिले.