वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार खेळी करत भारताला पराभूत करत सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. त्यामुळे भारताचं वर्ल्डकपचं स्वप्न भंगलं. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला. टीम इंडियाला चिअर करण्यासाठी बॉलिवूड स्टेडियमवर अवतरलं होतं. दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, शाहरुख खान, आशा भोसले या कलाकारांनी हजेरी लावली होती.मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहादेखील हजर होते. पण, या सामन्याचं माजी क्रिकेटर कपिल देव यांना मात्र आमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं.
यावरुन आता मराठी अभिनेत्याने संताप व्यक्त केला आहे. अभिनेता अभिजीत केळकरने संतप्त पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने बीसीसीय, आयसीसी, आणि क्रिकेट वर्ल्ड कप यांच्या ऑफिशिअल अकाऊंट्सला टॅग केलं आहे. "बीसीसीआय, आयसीसी आणि क्रिकेट वर्ल्डकपचा त्रिवार निषेध...लव्ह यू कपिल देव सर", असं त्याने म्हटलं आहे.
त्याबरोबरच अभिजीतने एक इन्स्टाग्राम स्टोरीही शेअर केली आहे. "हे तिरस्कार आणणारं आहे...आयोजकांना लाज वाटली पाहिजे", असं त्याने स्टोरीमध्ये म्हटलं आहे.
याबाबत कपिल देव यांनी प्रतिक्रिया देताना "मला माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत करायचा होता. पण, मला त्या सोहळ्यासाठी आमंत्रणच दिलं नव्हतं. त्यांनी मला बोलवलं नाही. त्यामुळे मी गेलोच नाही. मला असं वाटत होतं की अंतिम सामना पाहताना माझ्यासोबत १९८३ची संपूर्ण टीम असावी. परंतु, मला असं वाटतंय की खूप मोठं आयोजन होतं आणि कधीकधी लोक जबाबदाऱ्या सांभाळताना काही गोष्टी विसरुन जातात, " असं म्हटलं होतं.
कपिल देव यांनी १९८३ साली भारतासाठी पहिला वर्ल्डकप जिंकला् होता. त्यानंतर २०११ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. यंदाही १० मॅच जिंकून वर्ल्डकपमधील टॉप टीम ठरलेल्या इंडियाकडून भारतीयांना वर्ल्डकपची अपेक्षा होती. पण, भारताचं हे स्वप्न भंग झालं.