गेल्या काही दिवसांत देशातील महिला लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरणानंतर बदलापूरमधील शाळकरी विद्यार्थिंनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. बदलापूरमधील आदर्श महाविद्यालयातील दोन चिमुकल्या विद्यार्थींनींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याबाबत मराठी अभिनेत्याने पोस्ट शेअर करत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
मराठी अभिनेताअभिजीत केळकरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून बदलापूरमधील घडलेल्या प्रकाराबद्दल भाष्ये केलं आहे. या पोस्टमधून त्याने केवळ एकच सवाल विचारला आहे. "जे कृत्यच पाशवी, अमानवी आहे...त्याला शिक्षा तरी मानवी का असावी?" असा थेट प्रश्न अभिजीतने केला आहे. दरम्यान, समाजातील अशा घटनांवर अभिजीत नेहमीत व्यक्त होत त्याचं मत मांडताना दिसतो.
पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून खून केल्याची घटना ताजी असतानाच बदलापूर शहरात संस्कृतीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर नराधमाने अत्याचार केले आहेत. या प्रकरणात एका मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत, तर दुसऱ्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुली प्रसाधनगृहात जात असताना शाळेतील एका कर्मचाऱ्याने संतापजनक प्रकार मुलींसोबत केला आहे. दोन्ही मुलींनी पालकांना याबाबत माहिती दिल्यानंतर पालकांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 12 आणि 13 ऑगस्टला हा प्रकार घडला होता. त्यानंतर पालकांनी शाळा प्रशासनाला माहिती दिल्यावर मुलींची खाजगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर मुलींवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले.
बदलापूर शहरात काही दिवसांपूर्वीच एका बारा वर्षे मुलीवर सुद्धा अत्याचार झाला होता. याचा अजून पोलिसांना तपास लागलेला नाही. त्यातच आता हा समाजाला काळीमा फासणारा प्रकार घडल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणानंतर संतप्त पालकांनी आज बदलापूर स्थानकात रेल रोको आंदोलन केलं.