छोट्या पडद्यावर दररोज असंख्य मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. यात लवकरच स्टार प्रवाहवर (Star Pravah) 'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे (Urmila Kothare) तब्बल १२ वर्षांनी छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. त्यामुळे ही मालिका सध्या चर्चेत आहे. यामध्येच आता या मालिकेत उर्मिलासोबत गॅरी म्हणजेच अभिजीत खांडकेकर (Abhijit Khandkekar) स्क्रीन शेअर करणार आहे.
'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत गाण्याचं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या स्वराची कहाणी उलगडण्यात येणार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वरा आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहे. मात्र, स्वरा तिच्या आईसोबत राहात असून या माय-लेकींसोबत घरातील अन्य कोणतेही कुटुंबीय दिसत नाही. त्यामुळे स्वराचे वडील कोण? हा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो. तसंच स्वरालादेखील तिच्या वडिलांविषयी काही माहित नाही. त्यामुळे या मालिकेत स्वराचे वडील हे एक गुढ असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे यामध्येच आता स्वराच्या वडिलांची भूमिका कोण साकारणार यावरील पडदा दूर झाला आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचं एक पोस्टर व्हायरल होत आहे. यामध्ये उर्मिलासह अभिजीत स्क्रीन शेअर करणार आहे. या मालिकेत तो स्वराच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. तर, उर्मिला स्वराच्या आईची भूमिका साकारणार आहे.
दरम्यान, या मालिकेत स्वराची भूमिका बालकलाकार अन्वी तायवडे साकारत आहे. अन्वीने यापूर्वी काही हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. स्टार प्लसवरील ‘ये है चाहतें’ या मालिकेत अन्वीने साची ही भूमिका साकारली होती. तसंच सास बहू और साजीश , स्टोरी ९ मंथस की या मालिकामध्येही ती झळकली आहे.