मराठमोळा अभिनेता अंशुमन विचारे (Anshuman Vichare) पत्नी आणि लेकीसोबत व्हिडिओ शेअर करत असतो. अंशुमन आणि त्याची पत्नी पल्लवी (Pallavi Vichare) सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. शिवाय त्यांची चिमुकली लेकही मस्त मनोरंजन करत असते. मात्र नुकतंच पल्लवी विचारेने व्हिडिओ शेअर करत त्यांना आलेला वाईट अनुभव सांगितला. ठाण्यातील एका दुकानात त्यांना प्रचंड वाईट वागणूक मिळाल्याचा खुलासा तिने केला आहे.
पल्लवी विचारे व्हिडिओ शेअर करत म्हणाली, "सुपर बाय नावाचं हे दुकान आहे. व्हिडिओत दिसतोय तो इथला मॅनेजर आहे. याचं इन्स्टा रील बघून आम्ही इथे आलो. स्वस्तात ब्रँडेड शूज, ७० टक्के डिस्काऊंट वगरे असं इथे काही नाहीए. आम्हाला इथे अत्यंत वाईट वागणूक मिळाली. इथे काम करणाऱ्या मुलांना बोलण्याची पद्धतच नाही. या माणसाला खाली वेअरहाऊसमध्ये जाऊन शूज आणावे लागले. म्हणून हा अंशुमनला अत्यंत वाईट पद्धतीने बोलला. 'आधीच सांगता येत नाही का? खाली जाऊन आणावे लागले' असं तो म्हणाला. त्यावर मी त्याला सुनावलं की हे तुमचं कामच आहे. सर्विस सेक्टरमध्ये आहेस ना कामच केलंय. यात तुला इतका त्रास होण्यासारखं काय आहे. आता शूज घेतले नाहीत म्हणून त्याला त्रास झाला. अजिबात इथे जाऊ नका. फालतू ट्रीटमेंट आहे. दोन पैसे जास्त देऊन ब्रँडेड दुकानातून शूज घेणं परवडलं. अशी जर ट्रीटमेंट ग्राहकांना मिळत असेल तर इथे जाण्यात काही पॉइंट नाही. काही स्वस्त वगरे नाही. यांच्या शूजच्या किंमती ५-६ हजारांपासूनच सुरु होतात."
पल्लवीने या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, "जर दुकानमालकाला दुकान चालवण्यात थोडा जरी रस असेल तर कृपया आपल्या कर्मचाऱ्यांकडे जरा लक्ष द्या." तर एका नेटकऱ्याच्या कमेंटवर पल्लवीने लिहिले, "मी असं कधी करत नाही. कुणाच्या पोटावर पाय द्यायला मला खरच आवडत नाही. पण इतक्या वाईट पद्धतीने तो अंशूला बोलला जे मी सहनच करू शकत नाही, आणि समोर कुणीही असो तुम्ही प्रत्येकाला आदर दिलाच पाहिजे असं मला वाटतं."