मराठीतील विनोदी अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अतुल परचुरे (Atul Parchure). विनोदाचं अचुक टायमिंग साधत त्यांनी प्रेक्षकांना हसायला भाग पाडलं. इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे अतुल परचुरे खऱ्या आयुष्यात मात्र मोठ्या संकटातून गेले. पुन्हा कधी उभं राहता येईल की नाही अशीच त्यांना शंका होती. कॅन्सरवर मात करत त्यांनी पुन्हा कमबॅक केलं आहे. नुकत्याच झालेल्या 'झी नाट्य गौरव' पुरस्कार सोहळ्यात त्यांनी अनेक आठवणी ताज्या केल्या. यावेळी त्यांनी नाटकादरम्यानचा एक किस्सा सांगितला.
अतुल परचुरे झुरळांना प्रचंड घाबरतात. एका नाटकादरम्यानचा किस्सा सांगताना ते म्हणाले, "बऱ्याच वर्षांपूर्वी मी नातीगोती नाटक करत होतो. हे व्यावसायिक नाटक होतं. अशावेळी तुम्हाला बऱ्याच प्रसंगांना सामोरं जावं लागतं. गावोगावी, शहराशहरात ठिकठिकाणी नाटकाचे प्रयोग व्हायचे. असंच एका गावात प्रयोग होता जिथलं थिएटर काही महिने झाले उघडलंच गेलं नव्हतं. आमच्या नाटकासाठी थिएटरचा पडदा उघडला."
ते पुढे म्हणाले, "पडदा उघडताच पाहिलं तर तिथे राणीच्या बागेतही नसतील एवढे कीटक त्या पडद्यात होते. झुरळ, पालूी, डास यांचा उच्छाद होता. तिथली साफसफाई केली गेली आणि आमच्या प्रयोगाला सुरुवात झाली. नाटकात स्वाती चिटणीस माझ्या आईच्या भूमिकेत होती. एका सीनमध्ये ती कपाटातून साडी बाहेर काढते आणि नेसायला जाते असं होतं. त्यासाठी तिने साडी बाहेर काढली. तर त्यात दोन झुरळं होती. तिने तशीच साडी फेकून दिली आणि ती रागात निघून गेली. मी स्टेजवर झुरळांबरोबर काम नाही करुन शकत असं ती म्हणाली. नाटकात मी मतिमंद मुलाचं काम करत होतो. मी स्टेजवर बसलेलो असताना ती दोन झुरळं माझ्या दिशेने येताएत हे मी बघितलं. मी घाबरलो. कसंतरी त्यांना ढकलण्याचा प्रयत्न केला. मी ती माझ्याकडेच येताना दिसली. मग मी सुद्धा आत निघून गेलो. नंतर सहकाऱ्यांनी ती झुरळं मारली आणि मगच नाटक पुन्हा सुरु झालं."
अतुल परचुरेंचा नुकताच 'अलिबाबा आणि चाळीशीतले चोर' सिनेमा प्रदर्शित झाला. सध्या सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळतोय. मुक्ता बर्वे, उमेश कामत, मधुरा वेलणकर, आनंद इंगळे आणि सुबोध भावे यांच्या सिनेमात भूमिका आहेत.