मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे अविनाश नारकर. उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा अभिनेता सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे ते वरचेवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना त्यांच्याविषयीचे अपडेट देत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी गणेशोत्सवानिमित्त गावी जात असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या गावचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
अविनाश नारकर मूळचे कोकणातील आहेत. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त तब्बल ४ वर्षांनी ते गावी गेले. यावेळी त्यांनी त्यांच्या गावची एक झलक चाहत्यांना दाखवली. इतकंच नाही तर त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये खळखळणारा ओढा, डोंगर, हिरवळ, टुमदार घर असं सारंकाही नयनरम्य वातावरण पाहायला मिळालं. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या.
'हे माझं गाव आहे भुईबावडा. वर गगनबावडा आहे आणि खाली घाट उतरला की भुईबावडा. काय अप्रतिम निसर्ग आहे पाहा. मला सांगा या सगळ्यापेक्षा आणखी वेगळा स्वर्ग काय असतो? म्हणून तर गावी यायलाच पाहिजे. ते पण गणपती बाप्पाच्या उत्सवामध्ये तर यायलाच पाहिजे', असं अविनाश नारकर त्यांच्या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत.
दरम्यान, हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्येही गावी आल्याचा आनंद व्यक्त केला आहे. "यंदा गणपती बाप्पाच्या उत्सवासाठी गावी गेलो होतो...!! व्वा व्वा व्वा...!!निसर्गाच्या सहवासात मन आणि शरीर बघा कसं ताजंतवानं आणि टवटवीत होतं ते.......!! निसर्गाचा सहवास आणि बाप्पाचा ध्यास करी साऱ्या दु:खांचा ह्रास....!! गणपती बाप्पा मोरया...!!," असंही व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.