Devdatta Nage: अभिनेता देवदत्त नागे (Devdatta Nage) 'जय मल्हार' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत सर्वांच्या घराघरात पोहोचला.मराठी मनोरंजन सृष्टीत लोकप्रियता मिळवल्यावर हिंदी मनोरंजन सृष्टीतही त्याने स्वतःची ओळख निर्माण केली. आदिपुरुष, तान्हाजी यांसारख्या चित्रपटांमध्ये सुद्धा तो झळकला आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने ट्रेंकिंगचा अनुभव शेअर केला आहे.
नुकतीच देवदत्त नागेने 'इट्स मज्जा' ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये आताच्या तरुण पिढीमध्ये ट्रेकिंगची आवड निर्माण व्हावी यासाठी कोणता सल्ला द्याल, असा प्रश्न विचारण्यात आला. त्याबद्दल बोलताना अभिनेत्याने सांगितलं. "मी सुद्धा चंद्रकोर लावतो का तर राजांचं ते एक प्रतीक आहे. शिवाय आपलं मराठमोळेपण जपलं जातं यासाठी भंडारासुद्धा लावतो किंवा आपण गंध लावतो. आपल्याकडे बरीचशी मुलं मला दिसतात झेडें घेऊन किंवा कपाळी चंद्रकोर लावलेली, दाढी वाढवलेली असतात. पण, मला असं वाटतं की तुम्ही कधीतरी गडकिल्ल्यांवर राहा ना. तशी परवानगी आपल्याकडे सध्या नाही आहे. त्याचं कारण असं की, आपल्याकडे गडकिल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात ३१ डिसेंबर साजरा केला जातो. मी दर ३१ डिसेंबरला माझ्या पोलीस मित्रांसोबत लाईव्ह जात असतो आणि सांगतो की कृपया दारु पिऊन ड्राईव्ह करु नका आणि गडकिल्ल्यांवर तुम्ही दारु प्यायची नाही."
पुढे अभिनेता म्हणाला, "जेव्हा आम्ही ट्रेकिंग करायला जायचो तेव्हा मी स्वत: लोकांच्या दारुच्या बाटल्या फोडल्या आहेत. कोणी दारु प्यायला बसलं तर त्यांच्या बाटल्या फोडायच्या, की तुम्ही मला मारा हरकत नाही पण किल्ल्यांवर दारु प्यायची नाही. तर आताची पिढी मी बघतोय ती नशेच्या आहारी गेली आहे. त्यांना खूप स्वस्तात गोष्टी मिळतात. त्यांनी या गोष्टी करण्यापेक्षा शिवजयंती ते साजरी करतात ती कधीतरी गडकिल्ल्यांवर साजरी करा. पण ते गडकिल्ले असे तिथे लोक नेहमी येत असतील."
तरुण पिढीला दिला सल्ला...
"ज्या किल्ल्यांवर आम्ही जायचो तिथे कोणीही नसायचं. तुम्ही अशा किल्ल्यांवर जा जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाला आहे. त्याचबरोबर तुम्ही किल्ल्यांवर जाताना हे मनात ठेवा की तुम्ही राजेंसाठी तिकडे जात आहात. आपण तिथे आपल्या मित्र-मैत्रिणींसाठी जातोय, तिथे नाव लिहायला जातोय किंवा दारु पिण्यासाठी जातोय, असं करु नये. यासाठी मीच काय कोणीच तुम्हाला परवानगी देणार नाही. मी तरुण पिढीला येवढंच सांगेन की घरी आपण गाद्या, मऊ उशी घेऊन झोपतो. पण, तुम्ही कधीतरी गडकिल्ल्यांवरची दगडाची उशी किती मऊ असते ती अनुभवायला जा." असं म्हणत अभिनेत्याने मनातील भावना व्यक्त केली.