छोट्या पडद्यावरील उत्तम सूत्रसंचालक, अभिनेता आणि विनोदवीर डॉ. निलेश साबळे हे नाव कोणत्याही मराठी प्रेक्षक वर्गासाठी नवीन नाही. आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर या कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. इतकंच नाही तर त्याच्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने सातासमुद्रापार लोकप्रियता मिळवली आहे. विशेष म्हणजे एकाच वेळी विविधांगी भूमिका साकारणाऱ्या या कलाकाराला नेमके विनोद सुचतात कसे असा प्रश्न सर्व सामान्यांना कायमच पडतो. याच प्रश्नाचं उत्तर निलेशने दिलं आहे.
वैद्यकीय शिक्षणाबरोबरच आपल्यातील अंगभूत विनोदाची कला ओळखून ती जोपासत निलेशने कलेच्या क्षेत्रात यशाचं शिखर गाठलं. एक अभिनेता, दिग्दर्शक, मिमिक्री कलावंत, पटकथा लेखक, सूत्रसंचालक अशा अनेक भूमिकांमध्ये प्रेक्षकांनी निलेश साबळे याला पाहिलं आहे. चला हवा येऊ द्या सोबतच 'हे तर काहीच नाय' या कार्यक्रमाच्या दिग्दर्शनाची धुराही डॉक्टर निलेश साबळे सांभाळत आहेत. त्यामुळे या विविधांगी भूमिका तो कशा पार पाडतो हे त्याने सांगितलं.
"सतत आजूबाजूचं निरीक्षण करत राहणं. म्हणजेच, माणसं बघत राहणं आणि सतत काही ना काही शोधत राहणं याच्यातूनच हे सुचत जातं. सतत माणसं बघायची, माणसं शोधत राहायची. मी जरी रिक्षात बसलो तरी बघायचो की, तो रिक्षा कशी चालवतो? काही गंमत घडते का? लहानपणापासूनच मला विनोदाची फार आवड होती", असं निलेश म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "शाळेत असताना गॅदरिंगला मी स्वत:च छोट्या छोट्या गोष्टी लिहायचो व सादर करायचो. पुढे कॉलेजला गेल्यावरही विनोदावरचं प्रेम वाढतच गेलं. दिवसभर डोक्यात विचार चालूच असायचे."
दरम्यान, निलेश साबळे हे नाव आज मराठी कलाविश्वातील प्रचंड लोकप्रिय झालं आहे. त्याच्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली आहे.