छोट्या पडद्यावर अलिकडेच जाऊ बाई गावात हा कार्यक्रम सुरु झाला आहे. हटके कन्सेप्ट आणि स्पर्धकांना देण्यात येणार टास्क यांच्यामुळे हा कार्यक्रम अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे. या कार्यक्रमाचं अभिनेता हार्दिक जोशी सूत्रसंचालन करत असून नुकताच त्याने या कार्यक्रमात झालेल्या टास्कविषयी भाष्य केलं. एका टास्क दरम्यान त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती.
अलिकडेच हार्दिकने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने जाऊ बाई गावात या कार्यक्रमाविषयी आणि त्याच्या सूत्रसंचालनाविषयी भाष्य केलं. यात त्याने काही मजेदार किस्सेही शेअर केले. मात्र, एका टास्कदरम्यान, त्याचा एक छोटासा अपघात झाला. मात्र, या अपघातात त्याच्या हाताला चांगलाच मार लागला.
अलिकडेच या कार्यक्रमात आर्मी स्पेशल भाग झाला. या भागात स्पर्धकांना टास्क देण्यापूर्वी तो टास्क हार्दिकने पूर्ण करुन दाखवला. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्याने हा टास्क करायचं ठरवलं. परंतु, त्याला दुखापत झाली.
नेमका कसा झाला हार्दिकचा अपघात?
"तुम्ही नुकताच आर्मी स्पेशल भाग पहिला असेल त्यात एक टास्क होता, जो स्पर्धकांनी करायच्या आधी मी केला होता त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी. तो आर्मी टास्क करताना माझा हात निखळला, तरी पण मी तो टास्क पूर्ण केला. एका सूत्रसंचालकाची भूमिका निभावताना मी कुठे कमी तर पडणार नाही ना याची सतत मला काळजी घ्यावी लागते. इतक्या लोकांचा विश्वास, प्रेम आहे माझ्यावर आणि मी कोणालाच निराश होऊ देणार नाही. मी माझी जबाबदारी पूर्णपणे पडणार, असं हार्दिक म्हणाला.
दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच हार्दिक जोशी सूत्रसंचालकाच्या भूमिकेत झळकला आहे. परंतु, हार्दिक ही जबाबदारीही उत्तमरित्या पार पाडत आहे. त्यामुळे प्रेक्षकांकडूनही त्याला चांगली दाद मिळतांना दिसत आहे. विशेष म्हणजे तुझ्यात जीव रंगला या मालिकेत स्त्रियांपासून दूर पळणारा राणादा या कार्यक्रमामध्ये मुलींच्याच गोतावळ्यात दिसून येत आहे. त्यामुळे या कारणामुळेदेखील ही मालिका सोशल मीडियावर चर्चेत येत आहे.