पुण्यातील पोर्शे कार अपघाताची दाहकता कायम असतानाच मुंबईतील वरळीत एक भीषण घटना घडली. भरधाव बीएमडब्ल्यू कारने एका दुचाकीस्वार जोडप्याला धडक दिली, या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त बीएमडब्ल्यू कारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह होता. मिहीर शहाने अपघातानंतर थांबण्याचे सौजन्य न दाखवता बेदरकारपणे बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेचा जीव घेतला. ज्या महिलेला त्यानं चिरडलं, कावेरी नाखवा असं त्या महिलेचं नाव आहे. ती महिला अभिनेते जयवंत वाडकर (Jaywant Wadkar) यांची सख्खी पुतणी आहे. अभिनेत्याने याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे.
"आरोपीवर अजिबात दया दाखवली जाऊ नये. असल्या लोकांना एक सॉलिड कायदा काढला पाहिजे आणि फाशी द्यायला पाहिजे. ज्या विकृत पद्धतीने गाडी चालवून एखाद्या जीव घेणं हे काय आहे ना हे त्या माणसालासुद्धा समजलं पाहिजे. त्याला सुद्धा तशीच शिक्षा दिली पाहिजे. गाडी समोर साधा उंदीर जरी आला तरी आपण गाडी थांबवतो किंवा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. आज समोर एखादी व्यक्ती आपल्यासमोर गाडीच्या बोनटवर आहे आणि तिला दीड-दोन किलोमीटर घसरत घेऊन जाणं म्हणजे किती वाईट गोष्ट आहे? तिथे गाडी सोडून नंतर पळून जाणं म्हणजे तर खूप खूप वेदनादायक गोष्ट झालेली आहे", असं जयवंत वाडकर यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना म्हटलं.
टीव्ही 9 शी बोलताना जयवंत वाडकर यांनी जय शहा विदेशाबाहेरदेखील गेल्याची शंका व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "त्याच्या वडीलांना जामिन मिळाला आहे. डॉयव्हरची एक दिवसाची कस्टडी मिळाली आहे. मुलाचे सर्व रेकॉर्ड शासनाकडे आहेत. मुलगा कुठे गेला, कुठे गाडी सोडली. तो कुठच्या बारमध्ये होता. तेथून तो घरी आला. मर्सडिज गाडी घरी ठेवली. मग बीएमडब्ल्यू घेऊन तो निघाला. हा सगळा रेकॉर्ड असताना तो मुलगा गायब होतो. याचं मला नवल वाटतंय. शासनाने त्याला शोधलंच पाहिजे. कदाचित या सगळ्या गडबडीत तो देशाबाहेरही गेला असेल".
"अशा लोकांची जनमानसांतच ट्रायल चालू केली पाहिजे.. हा उद्दामपणा, पैशाचा माज थांबला पाहिजे. नियम तोडून वागणाऱ्या लोकांना फटके दिल्याशिवाय काही होणार नाही", असंही त्यांनी म्हटलं. कावेरी यांच्याबद्दल भावुक करणाऱ्या आठवणीही शेअर करताना ते म्हणाले, "ती माझी सख्खी पुतणी आहे आणि त्याबद्दल मला काय बोलू मला काहीच कळत नाही. त्या पोरीची आता गणपतीमध्ये मला एवढी आठवण येणार आहे. दादरवरुन फुलं आणणं, गणपतीची कंठी बनवणं वगैरे वगैरे त्या सगळ्याच गोष्टी आठवत राहतील. तिनं खूप कष्ट करून सगळं केलं होतं".
वरळी सीफेस येथील सी लिंकपर्यंत फरफटत नेले
वरळी कोळीवाड्यात राहणाऱ्या नाखवा दाम्पत्याचा मासेविक्रीचा व्यवसाय आहे. कावेरी वरळी कोळीवाड्यातील मासळी बाजारात मासेविक्री करीत असत. नाखवा दाम्पत्य रविवारी पहाटे क्रॉफर्ड मार्केट येथे होलसेल मार्केटमध्ये मासे खरेदीसाठी गेले होते. दोघेही वरळीकडे येत असताना ॲनी बेझंट रोडवरील लँडमार्क जीप शोरूमसमोर सकाळी ५:३० वाजता त्यांच्या दुचाकीला आरोपी मिहीर शहाच्या कारने धडक दिली.
अपघातानंतर प्रदीप नाखवा कारच्या बोनेटला धडकून डाव्या बाजूला पडले, तर कावेरी नाखवा कारच्या बोनेटसमोर आल्या. मिहीर शहाने कार थांबवून जखमी नाखवा कुटुंबाला मदत करण्याऐवजी कारचा वेग वाढवला आणि कावेरी यांना त्याच अवस्थेत दोन किलोमीटर वरळी सीफेस येथील सीलिंकपर्यंत फरफटत नेले. नंतर कार थांबवून गंभीर जखमी अवस्थेतील कावेरी यांना रस्त्यातच सोडून आरोपी मिहीर शहा वांद्रे-वरळी सागरीसेतूवरून पसार झाला. आरोपीने वांद्रे कलानगर परिसरात कार आणि चालक राजऋषी बिडावत याला सोडले आणि तेथून फरार झाला.