Join us

सगळा पिच्चर नाय सांगत... फक्त ‘ट्रेलर’ सांगतो...! किरण मानेंची शाहरूखसाठी आणखी एक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 1:57 PM

Shah rukh Khan Birthday : त्यो मानूस समाजासाठी काय-काय करतो हे जर सांगितलं, तर त्याची निंदा करनार्‍याचंबी डोळं पांढरं व्हत्याल,' असं किरण मानेंनी पोस्टच्या सुरुवातीला लिहिलं आहे.

बॉलिवूडचा किंगखान अर्थात अभिनेता शाहरुख खानचा (Shah rukh Khan Birthday) वाढदिवस. साहजिकच जगभरातील चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अशात शाहरूखचा ‘जबरा’ फॅन असलेले मराठमोळे अभिनेते किरण माने का मागे राहणार? होय,  ‘मुलगी झाली हो’  या मालिकेतील अभिनेते किरण माने ( Kiran Mane) यांनी शाहरूखच्या वाढदिवसाला भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. शाहरूखवर टीका करणा-यांना किरण माने यांनी खास शब्दांत उत्तर दिलं आहे. सगळा पिच्चर नाय सांगत... फक्त ‘ट्रेलर’ सांगतो, ऐकाच..., असं म्हणत किरण मानेंनी ही पोस्ट लिहिली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट जाम चर्चेत आहे.अगदी अलीकडे किरण माने यांनी शाहरूखसाठी अशीच एक पोस्ट शेअर केली होती. मुलाला ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर शाहरूख बाप म्हणून ज्या संयमानं वागला, त्याचं किरण मानेंनी कौतुक केलं होतं. आता त्यांनी शाहरूखच्या सामाजिक कार्याची माहिती दिली आहे. 

किरण माने यांची पोस्ट...

आपन ऐर्‍यागैर्‍यांना डोक्यावर घेत नाय भावांनो ! ह्यो किरण माने सातारी मातीतला हाय.. उगं कुना लुंग्यासुंग्याची उगाच तळी उचलून धरनार्‍यातला नाय ! समोर मानूसच डोंगराएवढा हाय... त्याची का स्तूती करनार नाय सांगा? त्यो मानूस समाजासाठी काय-काय करतो हे जर सांगीतलं, तर त्याची निंदा करनार्‍याचंबी डोळं पांढरं व्हत्याल.. सगळा पिच्चर नाय सांगत..फक्त 'ट्रेलर' सांगतो.. ऐकाच -

...ॲसिड ॲटॅक झालेल्या महिलांवर उपचार करनं.. त्यांच्या विद्रुप झालेल्या चेहर्‍यावर स्वखर्चानं प्लॅस्टिक सर्जरीसारखी महागडी ऑपरेशन्स करनं.. त्यांच्यावर मानसिक उपचार करुन त्यांच्या मनाला उभारी देनं..आणि त्यांना स्वत:च्या पायांवर उभं रहान्यासाठी सगळी आर्थिक मदत करनं.. ही सगळी कामं तो गेली कित्येक वर्ष करतोय.. ! खायचं काम नाय भावांनो..

...आपल्या आईवडिलांच्या आठवनीसाठी नानावटी हाॅस्पीटलात त्यानं लहान मुलांच्या कॅन्सरवरच्या उपचारांसाठी एक वाॅर्ड उभा केलाय, ज्यासाठी तो सतत लै मोठ्ठी आर्थिक मदत करत असतो !

...२०१२ साली त्यानं देशभरातली १२ खेडेगांवं दत्तक घेतली. तिथं स्वखर्चानं वीज-पाणी-शाळा आणि औषधं अशा सुविधा उपलब्ध करून देन्याचं काम त्यानं केलं. अजूनबी तिथं नवनविन सोयीसुविधा उपलब्ध करून देन्याचं काम तो आजतागायत करतोय !

...२००८ साली बिहार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी त्यानं जगभर लाईव्ह काॅन्सर्टस् करून ३० दशलक्ष रूपये जमा करुन दिले ! २०१५ मध्ये चेन्नई पूरग्रस्तांसाठी १ कोटी रूपये.. २०१३ मध्ये उत्तराखंड पूरग्रस्तांसाठी ३३ लाख रूपये.. तर डाॅ. मनमोहन सिंग यांच्या 'त्सुनामी रिलिफ फंड'साठी २५ लाख रूपये त्यानं स्वत:च्या खिशातून दिले !

...एक पत्रकार त्याची मुलाखत घेऊन परत जात असताना, त्या पत्रकाराचा ॲक्सीडेंट झाला.. तो गंभीर जखमी झाला. मृत्यूशी झुंज सुरू झाली.. अशावेळी त्या पत्रकाराचा बरा होईपर्यन्तचा सगळा हाॅस्पीटल खर्च त्यानं उचलला, जो दर दिवशी २ लाख रूपये होता !

...भारतभरातल्या झोपडपट्ट्यांमधल्या लहान मुलांच्या छोट्या-मोठ्या इच्छा-स्वप्न पूर्ण करणार्‍या 'मेक अ विश फाऊंडेशन' या समाजसेवी संस्थेबरोबर तो काम करतो !

...२००९ मध्ये ओरीसामधल्या ७ खेडेगांवांमध्ये त्यानं स्वखर्चानं सोलर इलेक्ट्रिसीटी प्रोजेक्ट सुरू केले.. ज्यामुळे स्वातंत्र्यानंतर तब्बल ६१ वर्षांनंतर त्या गांवांमध्ये 'लाईटस्' आले !

...I.P.L. सिझन 7 मध्ये त्याची टीम विजेता ठरली. बक्षिस म्हनून १५ कोटी रूपये मिळाले. ती सगळीच्या सगळी रक्कम त्यानं मुंबई आणि कलकत्त्यामधील गरीब कॅन्सर पेशंटस् वरील उपचारांसाठी दान करून टाकली !

...महाराष्ट्रातल्या आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटूंबीयांसाठी त्यानं जगभर काॅन्सर्ट करुन कोट्यावधी रूपये उभे केले तर इंडीयन आर्मीमधील जवानांसाठी ७ कोटी रूपये दिले !

...कोरोनाकाळात त्यानं स्वत:चं चार मजली ऑफीस बीएमसी ला दिलं. लाॅकडाऊनमध्ये मुंबईत १००० गरीब कुटूंबांना तेल, पीठ, तांदूळ, डाळ इत्यादी सामान पुरवलं. अगदी हातावर पोट असलेल्या २००० लोकांना रोज ताजं अन्न दिलं. बंगालमधल्या अतिशय दुर्गम खेड्यापाड्यांमध्ये जाऊन राशन आणि सॅनिटायझर पुरवलं.

______________

अशी लै लै लै लै लै कामं हायेत गड्याहो... मला अशा कमीतकमी दहा पोस्टस् कराव्या लागत्याल यवढी !! लक्षात ठेवा, ह्यो किरन माने कुठल्याबी मानसाला नीट पारखतो.. 'काम' बघून 'सलाम' करतो..! या त्याच्या कामांची जगभर दखल घेतली गेलेली हाय बरं का...

...त्यानं केलेल्या समाजोपयोगी कार्यासाठी त्याला जर्मनीमध्ये झालेल्या २० व्या UNESCO ॲवाॅर्डस् मध्ये स्पेशल ॲवाॅर्ड देऊन सन्मानित करन्यात आलंय.

...साऊथ कोरीयानं त्याला 'गुडविल ॲम्बॅसीडर' म्हणून सन्मानित केलंय.

...इंग्लंडमधल्या सर्वात मोठ्या 'लाॅ युनिव्हर्सिटी'तर्फे त्याला ह्यूमन राईटस् आणि ॲक्सेस टू जस्टिस ॲन्ड क्राईम मधील कार्यासाठी स्पेशल डाॅक्टरेट देन्यात आलीय.

तो फक्त अभिनयातला 'बादशाह' नाय, तर 'मानूस' म्हनून बी 'किंग' हाय ! सलाम शाहरूख खान... कडकडीत सलाम !! कुठल्याबी सच्च्या भारतीयाला तुझा अभिमानच वाटंल.. तुला वाढदिवसाच्या मनाच्या तळापास्नं शुभेच्छा भावा !!!

- किरण माने.

टॅग्स :शाहरुख खानकिरण माने