Kiran Mane Post For Siddhi Sharad Ponkshe: मराठी चित्रपटसृष्टी, नाटक, मालिकांमध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांची लेक सिद्धी पोंक्षे पायलट झाली. यानंतर शरद पोंक्षे यांनी लेकीचे कौतुक करणारी एक पोस्ट लिहिली. यावरून शरद पोंक्षेंनी ट्रोल करण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शरद पोंक्षे यांच्यावर सडकून टीका केल्यानंतर आता अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट लिहिली असून, अप्रत्यक्षपणे शरद पोंक्षे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
पोरी, नव्या जगात नवी उड्डाणं घे. तुझ्या करियरने छान ‘टेक ऑफ’ घेतलाय. आता तू जगभर फिरशील… मात्र सगळ्या सीमा पार करून खुल्या आसमंतात भरारी घेताना तुला आश्चर्याचे अनेक धक्के बसतील… घरात लहानपणापासून तुझ्या घरातल्या जवळच्या माणसाने, तुझ्या मनात ज्या थोर व्यक्तीविषयी द्वेष पेरलाय, ती व्यक्ती जगभर पूजनीय आहे, हे कळल्यावर मनामेंदूला बसणार्या हादर्याची आत्तापासून तयारी कर… जाशील त्या देशात तुला महात्मा गांधींच्या देशातली मुलगी म्हणून ओळखले जाईल, असे किरण माने आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हणतात.
जाशील त्या गांवात तुला बापूजींचा पुतळा दिसेल!
जाशील त्या गांवात तुला बापूजींचा पुतळा दिसेल! ऑस्ट्रेलियात तुला गांधी भेटेल… ताजीकिस्तानमध्येही तुला महात्म्याच्या पुतळ्याचे दर्शन होईल… स्पेनच्या बर्गोस शहरात, चायनाच्या बिजिंगमध्ये, मॉरीशस, सुरीनाम, पोलंड, कोरिया जाशील तिथे गांधी,गांधी आणि गांधीच असेल…. इंग्लंडमध्ये लंडन,वेस्टमिन्स्टर अशा अनेक शहरात तुला गांधीपुतळा दिसेल… अमेरीकेत तर भारताखालोखाल विक्रमी संख्येनं तुला आपल्या महात्म्याची मूर्ती दिसेल! गांधीविचारापुढं नतमस्तक होणारे हे सगळे जग वेडे आहे, की या सूर्यावर थुंकण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा माणूस माथेफिरू आहे, याचा तू गांभीर्यानं विचार करू लागशील…
अचानक तुला दुसरा हादरा बसेल
…हा विचार करेस्तोवर अचानक तुला दुसरा हादरा बसेल. अमेरीकेत कोलंबिया विश्वविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक दिसेल.. लंडनला सर्वांगसुंदर डॉ. भिमराव रामजी आंबेडकर मेमोरीयल दिसेल ! हंगेरीला डॉ. आंबेडकर हायस्कूल, इंग्लंडमध्ये वॉल्वरहॅम्प्टन बुद्ध विहार पाहून डोळे दिपतील… कॅनडाची सायमन फ्रेझर युनिव्हर्सिटी आणि जपानची कोयासन युनिव्हर्सिटी यांनी डॉ. आंबेडकरांच्या कार्याची, साहित्याची, शोधनिबंधांची माहिती देणारे विशेष विभाग स्थापलेत ते ही पहाशील… लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये डॉ. आंबेडकरांचा पुतळा दिसेल. या सगळ्या ठिकाणी जगभरातले विद्यार्थी डॉ. आंबेडकरांनी लिहीलेल्या पुस्तकांचा अभ्यास करताना दिसतील ! काहीजण ‘Annihilation of Caste’ वाचत असतील, तर काहीजण ‘The Untouchables: Who were they and why they Became Untouchables’ ची पारायणं करत असतील ! तू आंबेडकरांच्या इंडियामधली आहेस हे कळल्यावर त्या विद्यार्थ्यांना खूप आनंद होईल. ते तुला भारतातल्या हजारो वर्षांच्या अस्पृश्यतेबद्दल अनेक प्रश्न विचारतील. हजारो वर्ष ज्यांना शिक्षणापासून आणि सर्व गोष्टींपासून वंचित ठेवलं गेलं होतं… गुलामगिरीत पिचवलं होतं, ते शोषित-पिडीत आता या इनमिन पाऊणशे वर्षांत कुठपर्यन्त पोहोचलेत अशीही चौकशी करतील, असे किरण माने म्हणतात.
जवळच्या व्यक्तीने त्या बांधवांना सवलतींवरून टोमणे मारले आहेत
त्यांना हे सांगू नकोस की, मी यश मिळवल्यावर, माझ्या घरातल्या जवळच्या व्यक्तीनं त्या बांधवांना सवलतींवरून टोमणे मारले आहेत…, अजिबात सांगू नकोस हे… कारण जगभर वाईट मेसेज जाईल की या लोकांच्या मनात आजही अस्पृश्यतेचे विष आहे. आपल्या घरात अजून कितीही कचरा असला तरी बाहेरच्यांना तो दिसता कामा नये. त्यामुळे तू त्यांना खोटे हसत बळेबळेच सांग ‘सगळे ठीक आहे आमच्याकडे आता. …नंतर मात्र तुझ्या धडावर असलेलं तुझं डोकं वापरून या सगळ्यावर विचार कर. वाचन कर. पुन्हा विचार कर. तुला आसपास फक्त ‘माणूस’ दिसेपर्यन्त विचार करत रहा! असे किरण माने यांनी म्हटले आहे.
द्वेषाच्या कॅन्सरवर मात करायची हीच थेरपी आहे पोरी
तू भाग्यवान आहेस की तू अशा क्षेत्रात करीयर करतीयेस जिथं एकाचवेळी अनेक जात, धर्म, वंश, रंग, प्रांत, देशांची अनेक माणसे रोज एकत्र प्रवास करतात !! तुला रोज जाणवेल की या जगात जर कुठला धर्म असेल तर तो आहे ‘मानवता’. बाकी सब झूठ. मग तू हेच विचार तुझ्या पुढच्या पिढ्यांमध्ये मुरव. तुझ्या आधीच्या पिढीतल्या अविवेकी माणसांनी पसरवलेल्या द्वेषाच्या कॅन्सरवर मात करायची हीच थेरपी आहे पोरी…तुझं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!, अशी पोस्ट किरण माने यांनी लिहिली आहे.